आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हटले जाते. तसचं या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. खरं तर ज्या व्यास ऋषींनी महाभारत, वेद आणि पुराणांसारखे ग्रंथ आणि महाकाव्य लिहिली अशा व्यासमुनींना वंदन करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. गुरू व्यासमुनींची जागा कोणीही घेऊ शकत नाही अशी प्रत्येकाची श्रद्धा असते. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रातही सांगितले आहे. व्यास ऋषींना भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले जाते. त्यांनी लिहिलेल्या महाभारतासारख्या महाकाव्यातून आपल्यासमोर धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, युद्धशास्त्र आणि मानसशास्त्र यांसारख्या गोष्टी अगदी सहजपणे मांडल्या. सर्वज्ञानी माणसांचा राजा म्हणून व्यास ऋषींना संबोधले जाते. संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीमध्ये 'व्यासांचा मागोवा घेतू' असं म्हणूनच सुरुवात केली आहे.
संपूर्ण भारतात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असत. त्यावेळी ते श्रद्धेने आपल्या गुरूंची पूजा करून त्यांना गुरूदक्षिणा देत असत. आपल्या देशात पूर्वपार गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. या दिवशी आपण ज्या गुरूंकडून विद्या प्राप्त करतो. आणि त्या विद्येच्या बळावर स्वतःच्या पायावर उभं राहतो. त्या गुरूंबाबत कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्यासाठीच या दिवशी आपल्या गुरूंचा सन्मान करणं गरजेचं असतं.
आपल्या भारतीय परंपरांमध्येही अनेक गुरू शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये द्रोणाचार्य आणि अर्जुन यांच्यासोबतच एकलव्याची द्रोणाचार्यांप्रति असलेली निष्ठाही आपण जाणतोच. याव्यतिरिक्त दानशूर असलेल्या कर्णाला घडवलेले परशुराम, विश्वामित्र यांनी राम आणि लक्ष्मण यांना दिलेल्या शिकवणीच्या गोष्टीही आपण वेळोवेळी ऐकतोच. संत ज्ञानेश्वरांनी तर आपला मोठा भाऊ संत निवृत्तीनाथांनाच गुरू मानले होते. तर नामदेवांनी साक्षात विठ्ठ्लालाच गुरू स्थानी बसवले होते. अशा अनेक जोड्या आपल्याला आजही पहायला मिळतात.
आपल्या आयुष्यात आपणही प्रत्येक गोष्ट कोणाकडून तरी शिकत असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मदत करणारी, आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणारी व्यक्ती आपल्याला गुरूंच्या स्थानीच असते. त्यामुळे गुरूबद्दलच्या भावना व्यक्त करताना किंवा त्यांची महती सांगताना आपल्या तोंडून लगेच श्र्लोक बाहेर पडतो...
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ।।