डॉ. स्वाती गाडगीळ
मंगळवारी गुरूपौर्णिमा सर्वत्र साजरी होईल. गुरूर्ब्रह्म: गुरूर्विष्णू म्हणत शाळा, देवस्थान, आश्रमांमध्ये जो तो आपल्या गुरूला आवर्जून नमन करण्यास पोहोचेल. आयुष्यात गुरू हा असावाच. गुरूविना नाही ज्ञान... हे तर संतवचनच आहे. पण मग गुरू आणि सद्गुरूमध्ये फरक तो काय ? गुरू कोणास म्हणावे आणि सद्गुरू कोणास म्हणावे, हे समर्थ रामदासांनी दशक पाचवामध्ये स्पष्ट केले आहे. आज शिष्यांना फसवून, भुरळ पाडून, चमत्कार दाखवून स्वत:ला गुरू म्हणवून घेणाऱ्यांची कमी नाही. पण सद्गुरू कधीही स्वत:चा जयघोष करत नाही. गुरू अनेक चांगल्या प्रकारच्या विद्या शिकवतात, पण जीवन जगण्यासाठी चांगला आणि योग्य मार्ग हा सद्गुरू दाखवतो. कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्या शिष्याला आपल्यासारखं बनवतो तो सद्गुरू......................
शाळेत असताना, ५ सप्टेंबर हा 'टीचर्स डे' असतो आणि त्यादिवशी टीचरला फुलं देऊन शुभेच्छा द्यायच्या, हेच ठाऊक होतं. शिवाय, शिक्षकांसारखं तयार होऊन एकेक वर्ग आम्ही मुलं घेत असू. गुरूपौर्णिमेचे महत्त्व आणि त्या अनुषंगाने अनेक गुरूशिष्यांच्या कहाण्या वाचल्या होत्या. श्रीकृष्ण आणि सांदिपनी ऋषी, एकलव्य आणि द्रोणाचार्य, शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी अशा अनेकांची महती वाचली, त्यातून बोध घेतला. समर्थांनी वाघिणीचे दूध मागून शिवाजी महाराजांची, तर स्वामी विवेकानंदांनी गादीखाली नाणं ठेवून त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांची परीक्षा घेतली. विचार करायला लावणाऱ्या अशा अनेक कथा आहेत. पण, सद्गुरू कोणास म्हणावे आणि सत्शिष्य कसा असावा, हा खूपच गहन विषय आहे.
अलीकडेच विद्यार्थी व शिक्षकांची एक कार्यशाळा घेत असताना एका शाळेतील मास्तर उभे राहून पोटतिडकीने बोलू लागले, 'आजचे विद्यार्थी समोरून धावत जाताजाता आमच्या हातात गुलाबाचं फुल कोंबतात आणि हॅप्पी गुरूपौर्णिमा सर, असं म्हणून दुसऱ्या शिक्षकांकडे धावतात. यांच्यावर काही संस्कारच नाहीत.' मी म्हटलं, 'काळ बदलला, माध्यमं बदलली. बरोबर आणि चूकच्या व्याख्या बदलल्या, किंबहुना बरोबर आणि चूक'ची व्याख्या करणंच मोठं कठीण आहे आणि त्यातून आपण ना धड एक संस्कृती जपणारे. जागतिकीकरणाच्या नावाखाली सगळंच धेडगुजरी झालं आहे. योग्य संस्कार, त्यांना साजेसे विचार आणि त्यांना साजेसा आचार असावा. ही जबाबदारी कुणाची? आई ही पहिली गुरू असते. सगळ्याच जिजाऊ नाही होऊ शकल्या, तरी मातृत्वाचा किमान अनादर होणार नाही, एवढं तरी ध्यानी असू द्यावं. नंतर, मूल शिक्षकांच्या हवाली केलं जातं आणि तदनंतर सुरू होतं ते पालक आणि शिक्षकांमधील द्वंद्व. अशावेळी दोघांतीलही गुरू कुठेतरी हरवून जाण्याची भीती असते. चिंतन, मनन करावं व सद्गुरू आणि सत्शिष्य कसे तयार होतील, यावरच चित्त स्थिर करावं.
समर्थांनी दशक पाचवा समास दुसरा, यामध्ये गुरूबद्दल विस्ताराने विवरण केले आहे. गुरू आणि सद्गुरू यांच्यातील फरक समजावून सांगितला आहे. ते म्हणतात...सभामोहन भुररीं चेटकें। साबरमंत्र कौटालें अनेकें।नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥२॥
जो गुरू सभेतील लोकांची नजरबंदी करून त्यांना फसवतो व चेटूक करून भुरळ पाडतो, मंत्राचा वापर करून चमत्कार दाखवतो, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवतो, तोही गुरूच! पण सद्गुरू तो नव्हे! हाताच्या बंद मुठीतून अंगारा, फळं, गंडेदोरे काढून भक्तांना फसवणारे पण गुरूच म्हणवले जातात. भोळ्याभाबड्या महिलांचे शोषण केल्याचे आरोप असणारे व गुरूशिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावणारे आरोप सिद्ध होऊन तुरुंगवास भोगणारेदेखील स्वत:ला गुरू मानतात ! म्हणूनच, समर्थ म्हणतात, गुरू अनेक प्रकारच्या विद्या शिकवतात, पण चांगला आणि योग्य मार्ग दाखवतो तो सद्गुरू. धनधान्य,संपत्तीची अपेक्षा ठेवून विद्यादान करत नाही, तो सद्गुरू!
दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातु: स्पर्शश्चेत्तत्र कलप्य: स नयति यदहोस्वहृतामश्मसारम्।न स्पर्शत्वं तथापि श्रितचरगुणयुगे सद्गुरु : स्वीयशिष्ये स्वीयंसाम्यं विधते भवति निरु पमस्तेवालौकिकोपि ॥
वरील संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, म्हणजेच त्रिलोकी ज्ञान देणाऱ्या गुरूस उपमा नाही. गुरूला पारसमणी मानले, तर ते अयोग्य ठरेल, कारण पारसमणी लोखंडाचं रूपांतर फक्त सोन्यात करू शकतो, पण स्वत:सारखं नाही बनवत. सद्गुरू तर आपल्या शिष्याला आपल्यासारखं बनवतो म्हणून गुरूसाठी उपमा नाही, गुरू अलौकिक आहे, असा वरील श्लोकाचा अर्थ आहे.
आषाढ पौर्णिमेला 'गुरूपौर्णिमा' म्हणतात. या दिवशी व्यासऋ षींची पूजा केली जाते. चार वेदांचे जनक असलेले व्यास ऋ षी आदिगुरू मानले जातात. ईश्वराचे सगुण रूप असलेल्या गुरूंचे मनोभावे पूजन या दिवशी करतात.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात,अक्षै ठेवा सकळांचा।परी पांगडा फिटेना शरीराचा।तेणें मार्ग ईश्वराचा । चुकोनि जाती ॥३९॥
खरंतर, ईश्वर हा सर्वांचा अक्षय असा ठेवा आहे. परंतु, देहापासून सुख मिळवण्याची वासना काही कमी होत नाही आणि त्यामुळे भगवंताकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. वाट चुकून रस्ता भरकटत जातात. भगवंताच्या भेटीचा रस्ता दाखवतो व सहज त्यावरून जायला मदत करतो, तो गुरू. नुसतं विद्यादान करून थांबत नाही, पण योग्य रीतीने विद्यार्जनाची पद्धत शिकवून त्याचा आयुष्यात योग्य उपयोग करायला शिकवतो, तो गुरू !
मुख्य सद्गुरुचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।निश्चयाचें समाधान । स्वरुपस्थिती ॥ ४५॥सद्गुरूचे मुख्य लक्षण काय तर त्याच्यापाशी शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे. तो समाधानी पाहिजे, आत्मस्वरुपांत तो तल्लीन राहिला पाहिजे.याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ ।विशेष आचारें निर्मळ । स्वधर्माविषर्इं ॥ ४६॥
तो अतिशय वैराग्यसंपन्न असावा. त्याचे मन कशातही गुंतलेले नसावे. स्वधर्माविषयी तो जागरूक असावा आणि अत्यंत निर्मळही असावा.पाहिलंत, किती गुणांची माळ असावी लागते गुरूच्या ठायी! सोपं नसतं गुरू होऊन शिष्यांची जबाबदारी पेलणं! आधी स्वत:ला सिद्ध करावं लागतं. व्यासांनी सांगितलं आहे, जो वेदशास्त्रांमध्ये पारंगत आहे, पण त्याचा अन्वयार्थ ज्याला कळला नाही, ज्याला त्यातील गाभा आपल्या आचाराने सिद्ध करता आला नाही, त्याचं ज्ञान व्यर्थ आहे!
पूर्णे तटाके तृषित: सदैव भूतेपि गेहेक्षुधित: स मूढ: ।कल्पद्रुमे सत्यपि वै दरिद्र: गुर्वादियोगेपिहि य: प्रमादी ॥जो शिष्य चांगला गुरू मिळूनसुद्धा प्रमादी राहील, तो पाण्याने भरलेल्या तलावाजवळ असूनही मूर्खासारखा तहानलेलाच राहील. घरात धान्याची कोठारं भरलेली असूनसुद्धा उपाशी राहील आणि कल्पवृक्षाखाली बसूनसुद्धा दरिद्रीच राहील....तस्मै श्री गुरवैनम:!