- बा.भो. शास्त्रीजगाला आधी प्रेम द्यावे की ज्ञान? ज्ञान सर्वांना कळत नाही. त्याला बौद्धिक पात्रता लागते. केवळ ज्ञान रूक्ष असते. तुकाराम महाराज म्हणतात-‘आणिक नये माझ्या मनाहोकां पंडित शाहाणा’आपण यंत्रात ज्ञान लोड केले, पण त्याला भावना कुठे? त्याजवळ जिव्हाळा असतो का? म्हणून ज्ञानावर प्रेमाची सत्ता हवी. जगाला ज्ञानाची गरज आहे, पण भूक प्रेमाची असते. प्राण्यांसोबत मैत्री फक्त ज्ञानाने होत नाही. तिथे प्रेम लागते. हे हेमलकसा येथे प्रकाश आमट्यांच्या घरी कळते. प्रेम वाघाला व सापालाही मित्र बनविते. महर्षी नारदांनी भक्तीचे वर्णन करताना म्हटले आहे.‘‘सात्वस्मिन्परमप्रेमरुपा’’भक्ती परम प्रेमरूप आहे. भक्ती प्रेमाचा ओलावा घेऊनच मोठी होते. फुलाला कळी न होता कसे फूल होता येईल, दुधाचे दही दह्याचे लोणी व लोण्याचे तूप असा हा विकासक्रम कसा टाळता येईल. प्रेम हे जात, धर्म, प्रांताच्या सीमा ओलांडून पलीकडे जाते. ज्ञानही जाते, पण प्रेमाची पकड घट्ट दिसते. संत तुकाराम महाराज व अनगडशाहा हा मुस्लीम फकीर दोघांची जात वेगळी धर्म वेगळा, मग मैत्री कशी जमली. याचे उत्तर कबिरांनी भजनात असे दिले आहे. ‘सबसे उची प्रेम सगाई’ प्रेमाचा स्वभाव ज्ञानापेक्षा निराळा. ज्ञानात गणित व प्रेमात भावना असते. ज्ञानात दंभ व प्रेम नम्र आहे. ज्ञान वर सरकते, प्रेम खाली झिरपते. ज्ञान प्रकाश आहे, प्रेम पाणी आहे. ज्ञान मागते, प्रेम देते. ज्ञान शिक्षा सांगते, प्रेम क्षमा करते. ज्ञान भेद सांगते, प्रेम अभेदात नेते. ज्ञान शब्दातून व प्रेम कृतीतून येते. ज्ञान दु:ख ओळखते, प्रेम मदत करते. ज्ञान ताठर, प्रेम लवचिक आहे. पैठणच्या ज्ञानी लोकांनी उन्हात मूल रडताना पाहिले, पण प्रेमळ नाथांनी त्याला कडेवर घेतले, एक सुशिक्षित मुलगा बापाला वृद्धाश्रमात पाठवितो व दुसरा दुबईतून मुलगा बापाला फोन करून विचारतो, पप्पा तुम्ही वेळेवर जेवता का? गोळ्या वेळेवर घेत जा. तेव्हा बापाला दुबई लांब असून जवळ वाटते व दुसरा जवळ असून लांब वाटतो. खरच प्रेम निरुपम आहे. श्रीचक्रधर म्हणजे मूर्तिमंत प्रेम होते. त्यांनी समताही ममतेने सांगितली. ज्ञानाचे महत्त्व कमी न करता प्रेमाचे त्यांनी उदात्तीकरण केले आहे. ज्ञानाला न दुखावता म्हणाले,‘ज्ञानापसी प्रेम उत्तम.’
‘ज्ञानापसी प्रेमा उत्तम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 2:23 AM