बा. भो. शास्त्रीमाणूस जन्माला आला त्याचक्षणी उपद्रव सुरू होतात. काही टाळण्यासारखे तर काही गिळण्यासारखे असतात. काही सोबत लढवं लागतं. युद्धातली शस्त्रं वेगवेगळी असतात. डासांचा उपद्रव असेल तर धारदार शस्त्र कामाचे नाहीत. साखरेच्या डब्यात मुंग्या होतात, त्यांनी येऊ नये म्हणून अद्याप गेट तयार झालं नाही; पण डब्यात थोड्या लवंगा टाकल्या की हेच त्यांच्यासाठी शस्त्र आहे. सामूहिक उपद्रवाचं निवारण कसं करावं, हे जाणते सांगतात. कुटुंबात कलह होत असेल तर वेगळं होणं शस्त्र आहे. असाच सार्वत्रिक उपद्रवाचा प्रश्न नागदेव श्रीचक्रधरांना विचारतात, तेव्हा त्यांनी सूत्रातून त्याचं समर्पक उत्तर दिलं.
आपणे या उपद्रव उठी, तयाचा असंबंध किजे।उपद्रवी लोकांपासून चार हात लांब राहावं. यालाच असंबंध म्हटलं आहे. हेच आज करोना विषाणूसाठी उपयुक्त शस्त्र आहे. संसारापासून स्वत:च्या बचावासाठी संन्यासी, वैरागी, फकीर असंग शस्त्राचा उपयोग करतात. सध्या कोरोनाचा भयंकर उपद्रव होत आहे. त्याला कसं तोंड द्यायाचं, हाच आता या जगापुढे मोठा प्रश्न आहे. आम्ही गीतेलं विचारलं तेव्हा तिने असंग शस्त्राचा सल्ला दिला. शास्त्रज्ञही तेच सांगत आहेत. कोरोना बाधितांचा व त्यांनी वापरातल्या वस्तूंचा संग टाळा. अंतर पाळा. यालाच असंग म्हणायचं. कोरोना विषाणूही दिसत नाही. पण त्याची मुळं जगभर पसरली आहेत. त्यावर सध्या औषध उपलब्ध नाही. आता उपायच उरला नाही. असं अनेकांनी कबूल केलं आहे. हे विधान स्वामींना आवडत नाही. ‘उपाओ न पविजे ऐसे कोई असे’, असं ते म्हणतात. दु:ख आहे तर कारणही आहे. कारण आहे तर उपायही आहे. म्हणून घाबरण्याचं कारण नाही. विवेकी माणूस कारणं शोधून उपाय सांगणारच आहे. पण तुर्त कोरोनाला टाळण्याचा गीतेच्या ‘असंग’ या शब्दात आहे. स्वामींनी त्याऐवजी ‘असंबंध’ शब्द वापरला आहे. सुरक्षित अंतर हा विघ्ननाशक उपाय आहे.