सद्गुरू जग्गी वासुदेव
आपण एका अति-स्पर्धात्मक जगात वावरत आहोत ज्या ठिकाणी प्रत्येकालाच सर्वोत्तम व्हायचे आहे. माझ्यासाठी योग्य मार्ग कोणता हे ठरविणे मला अवघड जात आहे कारण मी जरीही एखाद्या गोष्टीत चांगला असलो, उदाहरणार्थ नृत्य, तरी तेथे माझ्यापेक्षा अधिक चांगले कोणीतरी असतेच. समाजाच्या आपल्याकडून सर्वोत्तम असण्याच्या अपेक्षांऐवजी केवळ आनंदी राहण्याच्या एकमात्र उद्देशासाठी एखादी कृती करण्याची प्रेरणा मी कशी मिळवू शकतो, असा प्रश्न कायम विचारला जातो. तुम्ही जर खरेच त्याकडे पाहिलेत, तर आपल्याला सर्वोत्तम बनायचे नसते कारण सर्वोत्तम म्हणजे काय हेच तुम्हाला ठाऊक नसते. आपल्याला केवळ आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करून दाखवायची असते. ही एक व्याधी आहे; कारण तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही आनंद मानत नाही, तर इतरांकडे नसलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही आनंद मानत असता. जेव्हा इतर लोकांच्या वेदना हा तुमच्या आनंदाचा स्रोत असतो, तेव्हा तो एक आजार आहे असेच म्हणावे लागेल. आणि या आजाराने लोकांना अगदी लहान वयातच गाठले आहे. तुम्हाला शिकविले जाते, ‘‘तू प्रथम क्र मांकच मिळवायला हवा.’’ तुम्ही असे कधीही विचारले नाही, ‘‘मग इतर मुलांचे काय?’’ ‘‘त्याने काही फरक पडत नाही! तुम्ही प्रत्येकाच्या वरचढच असले पाहिजे, तरच जीवन सुखकर होईल!’’ अशाने स्वास्थ्य लाभणार नाही तुम्हाला किंवा जगाला. सर्वोत्तम असण्याऐवजी, या जीवनाची संपूर्ण अभिव्यक्ती शोधणे महत्त्वाचे आहे. तुमच्यामध्ये दडून बसलेल्या सर्व क्षमता तुम्ही आजमावून पाहा. हे जीवन अपूर्ण राहायला नको. ते इतरांपेक्षा अधिक चांगले आहे की नाही, हा प्रश्नच नाही. जीवन ही शर्यत नाही.