बा.भो. शास्त्री‘आचारे योग्यता विचारे दृढता’ हे श्रीचक्रधरांचं वचन आहे. त्याचा आकार लहान पण आशय महान असतो. ज्याच्या ज्याच्या शब्दात अल्पाक्षरी असंदिग्ध हे त्याचं लक्षण आहे. आचाराने योग्यता व विचाराने स्थैर्य प्राप्त होतंं. हाच त्याचा मथितार्थ. हे सूत्र माणसाला संंत करतं. अयोग्याला योग्य करतं आणि अस्थिरतेला स्थिर करतं. असंताला संंत करतं. संंत हे आधी माणूसच असतात. हिरा आधी कोळसाच असतो. तूप आधी दूधच असतं. विस्तार हा संकोचच असतो. माणसात गुणदोष असतात तर संत हे निर्दोष व शुद्ध अंंत:करणाचे असतात. पण माणसाकडून संतत्वाकडचा प्रवास कशाने होतो, यावर प्रस्तुत सूत्राने प्रकाश टाकला आहे. ज्ञानेश्वरी पूर्वी याच सूत्रांनी माणसं घडविली.
मराठीत प्रथमच वचनं जन्माला आली. विचाराने विकारावर मात केली. म्हाइंभटाचा अहंकार व नागदेवाचा क्रोध मावळला. ज्ञान बदललंं की क्रिया बदलत असते. मार्ग बदलतो. दृष्टी बदलते रित्या माणसात दैवी गुण येतात. शब्द साधे असले तरी त्यांंच्यात मंंत्राचंं बळ येतं. याच सूत्रांनी त्या काळात व्यक्तिमत्त्व घडवलं. चारित्र्य धवल केलं. आचार व विचार या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली एक बाजू घासली तर समाज त्या नीतिशून्य अविचारी मानवी नाण्याला पूर्ण स्वीकारत नाही. घराला किंवा जगाला नेहमी दोन गोष्टींची गरज असते. एक आचार व दुसरा विचार, हे दोन्हीही संसार व परमार्थाला पूरक आहेत. प्रथम आपल्याला आचाराचाच विचार करावयाचा आहे. शुद्ध झाल्याशिवाय बुद्ध होता येत नाही. आचाराच्या पायावरच विचाराची इमारत उभी राहते. समृद्ध आचाराने उच्चार बदलतात. डोळ्यात समता व हृदयात ममता नांदते.