- रमेश सप्रेवार्षिक उत्सव चालू होता देवीचा. राजाची कुलदेवी असल्याने प्रजेचीही ग्रामदेवी बनली होती. सुंदर मूर्ती, भव्य मंदिर आणि उत्साह व उमेद यांनी भारलेला उत्सव. मग काय, सगळी मोठी धामधूम नि आनंदीआनंद होता. उत्सवाचा अखेरचा विधी म्हणजे देवीची रथातून मंदिर प्रदक्षिणा. वर्षपद्धतीनुसार प्रदक्षिणा दिमाखात सुरू झाली. सर्वत्र जल्लोष सुरू होता. सर्वाच्या नजरा झगमगीत रथावर खिळल्या होत्या. देवीचा जयघोष उच्च स्वरात सुरू होता. याचवेळी त्या गर्दीत तीन चार दिवसांचा भुकेला बालक अन्नासाठी याचना करत होता; पण त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता? त्या बालकाला एका बाईच्या कडेवर एक मूल दिसलं. त्याचंही लक्ष रथाच्या मिरवणुकीकडे होतं. त्याच्या हातात एक उघडा पुडा होता चणे शेंगदाण्याचा. या भुकेलेल्या बालकानं हळूच जाऊन तो पुडा जरा तिरका करून आठ दहा दाणे हातात घेऊन तोंडात टाकले. ते अधाशाप्रमाणे संपवल्यावर आणखी घेणार इतक्यात सारा जल्लोष थांबला. सर्वत्र चिडीचूप शांतता पसरली. कारण? कारण रथ एकदम थांबला तो हालेचना. अधिक लोकांनी ओढायचा प्रयत्न केला पण व्यर्थ! एक तसूभरसुद्धा रथ पुढे सरकत नव्हता. त्याचवेळी आकाशवाणी झाली देवीच बोलत होती, ‘माझ्या दर्शनासाठी आलेल्या तुम्हा मंडळीत अनेक जण चोर आहेत, पापी आहेत, कोणीही एकानं येऊन माझ्यापुढे आपल्या पापाची कबुली दिली तरच हा रथ हालेल. नाहीतर जमिनीत गाडलेल्या अवस्थेत इथंच पडून राहील.'तसं पाहायला गेलं तर जवळ जवळ प्रत्येक जण पापी होता; पण पापाची जाहीर कबुली कोण देणार? राजाच्या मनात आलं, आपण जिच्या प्रेमात आहोत त्या राजनर्तकीला आपण राणीच्या नकळत तिचाच एक रत्नहार भेट दिला होता. राणीच्या मनाला आपल्या सेनापतीबरोबर असलेल्या विवाहबाह्य संबंधाची आठवण झाली. सेनापतीला राजाविरुद्ध मंत्र्यांच्या मदतीनं केलेल्या कपटकारस्थानाची स्मृती झाली. देवीच्या पुजाऱ्याला देवीला अर्पण केलेल्या अनेक सोन्यामोत्यांच्या अलंकारापैकी काही चोरून आपल्या घरी नेल्याचं स्मरण झालं. गर्दीतील अनेकांच्या मनात आपण केलेल्या पापांची उजळणी होत होती. सारे एकदम शांत झाल्यानं त्या भुकेल्या अनाथ बालकानं त्या कडेवर मूल घेतलेल्या बाईला विचारलं, ‘काय झालं? एकदम सारं शांत कसं झालं?’ यावर ती म्हणाली, ‘या सगळ्या लोकांत अनेक जण पापी आहेत. चोर आहेत. कोणीही एकानं देवीसमोर जाऊन आपल्या पापाची कबुली दिली की रथ पुन्हा हलू लागेल.’निरागसपणे त्या बालकानं विचारलं, ‘पाप म्हणजे काय गे माये? आणि चोरी म्हणजे?’ शांतपणे ती माता त्याला म्हणाली, ‘जी वस्तू आपली नाही. ती आपण त्याच्या नकळत पळवून वापरली तर ती चोरी आणि चोरी हे पापही आहे.’ हे ऐकल्यावर डोक्यावर आकाशातून रोज कोसळावी तसा बुद्धीवर वज्राघात होऊन त्या बालकाला आतून जाणवलं की काही वेळापूर्वी त्या बाईच्या नकळत तिच्या मुलाच्या पुड्यातले काही चणे फुटाणे आपण खाल्ले ही चोरी होती तर!’हा विचार मनात येताच तो बालक एखाद्या बाणासारखा वेगाने गर्दीला दूर सारत रथासमोर गेला नि त्यानं देवीला आपल्या गुन्ह्याबद्दल कबुली दिली. त्याच क्षणी रथ एकदम चालू लागला. बालक खाली मान घालून रथासमोर चालत राहिला. खरं तर त्याच्या त्या अतिसामान्य चोरीच्या कबुलीजबाबानंतर रथ चालू लागला खरा. पण सर्वांना आपण केलेल्या पापांची लाज वाटू लागली.इतक्यात एक स्फोट झाला रथात. सर्वानी डोळे बंद करून कानावर हात ठेवले. काही वेळात डोळे उघडून पाहतात तो काय आश्चर्य! देवीच्या मूर्तीचे तुकडे तुकडे होऊन ते आकाशात उडून गेले होते. प्रदक्षिणा चालू राहिली; पण आता ती देवीची प्रदक्षिणा नव्हती तर होती फक्त रथप्रदक्षिणा!राजाला, राणीला, प्रधानाला, पुजाऱ्याला, सेनापतींना मनोमन वाटलं आपली पापं तर याहून कितीतरी मोठी नि भयंकर होती; पण धाडस नव्हतं आपल्यात सर्वाच्या समोर आपल्या पापांची कबुली देण्याचं.आपलं सर्वाचंही असंच होतं. याचा अनुभव मनाचे वैद्य असलेल्या संतांना असल्याने त्यांनी असंच सांगितलं की पापाचा तिरस्कार करा, पापी व्यक्तीचा नको. (हेट द् सिन्,नॉट द सिनर्) ज्ञानदेवांनीही पसायदानात हेच सांगितलंय-‘खळांची व्यंकटी सांडो’ म्हणजे दुष्टांची वेडीवाकडी, पापी बुद्धी-वृत्ती यांचा नाश व्हावा आणि ‘तया सत्कर्मी रति वाढो’ दुष्ट लोकांचा नाश न करता त्यांच्या दुष्टबुद्धीचा संहार व्हावा’ असे मागणारे साधुसंत हे निश्चित ‘विनाशायच दुष्कृताम’ म्हणत रावण-कंस यासारख्या पापी व्यक्तींचा संहार करणाऱ्या देवाच्या अवतारापेक्षा श्रेष्ठ असतात. नारद, वाल्याचा विनाश करत नाहीत तर त्याचा नामाच्या माध्यमातून वाल्मीकी ऋषीच्या रूपात विकास घडवतात. पापांची कबुली देऊन मन:शांती नि आनंद मिळवण्यासाठी संतांना शरण जाणंच श्रेयस्कर!
प्रदक्षिणा - पापाची कबुली देणार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 9:30 PM