सुसंगती सदा घडोसुजन वाक्य कानी पडो...!कलंक मतीचा झडोविषय सर्वथा नावडो...!!
व्यक्तिविकासात संगतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाची जडण-घडण ही सभोवतालच्या वातावरणावर आणि संगतीवर बहुतांश वेळी होताना दिसते. याला काही अपवाद असेलही, परंतु तो अपवादच. मोरोपंतांनीही हेच विशद केले असून फक्त संगतच नाही, तर चांगले विचारदेखील ऐकण्यात येणे गरजेचे आहे. जेणेकरून विकृत मनोवृत्तीचा पाडाव केला जाऊ शकतो. बाह्यांगाची नक्कल अथवा प्रतिकृती सजीव स्वरुपात अस्तित्वात आणणे अशक्य आहे. तथापी, गुण-दोष-विकृती सहज अंगीकारली जाते. म्हणूनच म्हटले जाते...ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण घेतला... सद्गुणाची वाढ ही सद्गुणाच्या संगतीने जलद गतीने होते. मनाची अवस्था ही बाह्यांगावरून निश्चल न होता अंतरंगावरून होते. म्हणून इंग्रजी म्हणीप्रमाणे व्यक्तीची ओळख ही त्याच्या सोबतच्या मित्रांवरून होते, असे म्हटले जाते.
समविचारी माणसांची मैत्री फार लवकर होते. तसेच वाईट गुणांचा गुणाकार होण्यास वेळ लागत नाही. चांगल्या व्यक्तींचा सहवास हा चांगल्याच प्रवृत्तीची जोपासना करीत असते. परिसाच्या संगतीत लोखंड आले तर त्याचे सोने होते. चंदनाच्या संगतीत बोरी-बाभळी जरी वाढली तरी तीस चंदनाचा सुवास आल्याशिवाय राहात नाही. याउलट कडुलिंबावर चढलेला वेल हा कडूपणा घेणार हे निश्चितच. म्हणूनच सद्गुणी व्यक्तीच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीचा कायापालट होतो. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर माऊलींनीदेखील विश्वकल्याणची संकल्पना रुजविताना म्हटले आहेच...
जे खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रति वाढोभूता परस्परा जडोमैत्र जीवांचे...!
म्हणून महान व्यक्ती या सत्कार्यासाठी कार्य करताना दिसतात, ना की सत्कारासाठी. त्याचप्रमाणे चांगल्या विचारांची पेरणी करण्यासाठी मनापासून झिजावे लागते, दिखाव्याकरिता नाही. माणूस ज्याच्या संगतीत राहतो त्यांचे चारित्र्य व स्वभाव आत्मसात करतो.
आपण ज्यांची मैत्री स्वीकार करतो त्याचा आपल्या कार्यावर आणि चैतन्यावर निश्चितच प्रभाव पडतो. म्हणूनच सुस्वभावी व जागृत मनोवृत्तीच्या लोकांची संगती लाभणे आवश्यक आहे. आध्यात्मिक व्यक्तीच्या संगतीत अलौकिक शक्तींची वृद्धी होते. चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्याचा विवेक जागृत होतो. विवेकी वृत्ती जागृत ठेवूनच मित्र निवडावे लागतात. समाजहित जरी खरी असले, तरी स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील फरकदेखील समजून घेणे गरजेचे आहे. संगतीत मिळणाऱ्या सोबत्यावर व्यक्तिमत्त्व विकासाची मुळे रोवली जातात. ‘युवर फ्रेंड कॅन मेक यू, ऑर ब्रेक यू’ हे देखील वाक्य तेवढेच खरे आहे. संत रामदासांनी अत्यंत मार्मिक शब्दात चांगल्या संगतीचा ऊहापोह केला आहे. ते म्हणतात...
आपला आपण करी कुडावातो आपला मित्र जाणावाआपला नाश करी तोसमजावा वैरी ऐसा...!जो व्यक्ती स्वत: आपला घात करून घेतो, तो पातकी असतो. उद्योगी व शहाण्या माणसाच्या संगतीने आपण उद्योगी व शहाणे, तर आळशी व मूर्ख माणसांच्या संगतीने आपण आळशी व मूर्खच बनतो.
- डॉ. भालचंद्र ना. संगनवार ( लेखक लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )