- सदगुरू श्री वामनराव पैआपल्याला सुख शांती देणारा हा देव आहे कुठे तर तुकाराम महाराज सांगतात हा देव नाही कुठे.“तुका म्हणे विठो भरला सबाह्यी तया उणे काय चराचरी”. कारण तो सर्वांमध्ये आहे व आपण सतत शुभ बोलून सर्वांना सुखी करणे हेच खरे भजन आहे. याचा अर्थ आपण टाळ घेवून भजन करतो ते भजन वाईट आहे असे नव्हे. टाळ घेवून भजन करणे हा उपासनेचा एक भाग झाला पण तुकाराम महाराज तिथेच थांबत नाहीत तर ते पुढे असे सांगतात की देवाने माणसाला बुध्दी दिली आहे तसेच देवाने माणसाला वाचा देखील दिली हे एक अनोखे वैशिष्टय आहे. कारण देवाने ही वाचा फक्त माणसालाच दिलेली आहे इतर प्राण्यांना दिलेली नाही. त्यामुळे फक्त माणसालाच बोलता येते इतर प्राण्यांना बोलता येत नाही.
प्राण्यांना शिकविले तर थोडे फार बोलू शकतील. पण देवाने वाचा दिलेली आहे हे माणसाचे केवढे भाग्य आहे. कल्पना करा मुक्या माणसाला केवढे वाईट वाटत असेल इतर माणसांना बोलताना पाहून. पण आपण बोलतो याचा आपल्याला खरा आनंद आहे का? नाही याचे कारण अतिपरिचयात अवज्ञा. बघा नवीन मोटार घेतली की सुरवातीला काय आनंद होतो. पण नंतर आपणच म्हणतो ड्रायव्हिंग करणे म्हणजे काय ताप आहे. आपण बोलतो ही देवाची केवढी मोठी कृपा आहे. माणूस ही देवाची प्रतिकृती आहे असे जे मी म्हणतो त्याचे कारण हेच आहे.
जीवनविद्येचा सिध्दांत आहे मानवी शरीर ही परमेश्वराची प्रतिकृती आहे. मानवी शरीर हे साक्षात परमेश्वर आहे. मानवी शरीराकडे बघा.अगदी केसांपासून ते पायाच्या अंगठयापर्यंत सगळे दिव्य आहे. प्रत्येक अवयव दिव्य आहे.डोळे आपल्याला देवाने दिलेत हे आपलं किती भाग्य आहे. याबाबत आंधळ्याला विचारा तो म्हणेल या जगात भाग्यवान तोच ज्याल्या डोळ्यांनी पहाता येते. मुका काय म्हणेल ज्यांना बोलता येते त्यांच्याइतके भाग्यवान दुसरे कुणीच नाही.बहिरा असेल तो काय म्हणेल ज्यांना ऐकता येते त्यांच्याइतके भाग्यवान कुणीच नाही. लंगडा काय म्हणेल ज्यांना चालता येते त्यांच्याइतके भाग्यवान दुसरे कुणी नाही.
जे थोटे असतील ते काय म्हणतील ज्यांना देवाने दोन हात दिले त्यांच्याइतके भाग्यवान कुणी नाही. त्यामुळे प्रत्येक अवयव हा दिव्य आहे.त्याचे मोल करता येणार नाही इतके ते दिव्य आहेत. एका कवीने फार सुंदर म्हटलेले आहे,“डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आम्ही बोलतो, हातांनी बहुसाळ काम करितो विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरूनी उठतो ही ईश्वराची द्या” यात फक्त द्या या शब्दाऐवजी कृपा हा शब्द वापरला पाहिजे होता. देवाची म्हणा नाहीतर निसर्गाची कृपा म्हणा. जे देव मानत नाहीत त्यांनी निसर्गाची कॄपा म्हणावी.