- रमेश सप्रे
नासिरूद्दिन होडजा नावाचा एक चतुर माणूस होऊन गेला. आपल्या बिरबलासारखा किंवा तेनाली रमणसारखा हजरजबाबी आणि प्रसंगावधानी होता तो. त्याचे अनेक किस्से सांगितले जातात. ते नुसते मनोरंजक नसतात तर उद्बोधकही असतात. त्यातून आपल्या आजच्या जीवनाला मार्गदर्शन मिळते. हा किस्सा पाहा. एकदा नासिरूद्दिनला पोहणं शिकण्याची लहर आली. त्यानं आपल्या पत्नीला आपल्या मनातला विचार सांगितला. तिनं होकार देताना एक महत्त्वाची सूचनाही दिली. ‘आपल्या गावात तो एक पहलवान आहे ना? त्याच्याकडून शिका. म्हणजे तुम्ही बुडू लागलात तर तो आपल्या शक्तीनं तुम्हाला वाचवेल. नाहीतर तुम्ही शिकवणा-याला बरोबर घेऊन बुडाल. समजलं ना?’ ठरल्याप्रमाणे तो त्या पहलवानासह नदीच्या काठावर पोचला. पैलवानानं आपले कपडे काढले आणि तो पाण्यात उतरला नि त्यानं मजेत पोहायला सुरुवात केली. त्यानं नासिरूद्दिनलाही कपडे काढून पाण्यात यायला सांगितलं. आतापर्यंत पोहणं शिकायला उत्सुक असलेल्या नासिरूद्दिनला पाणी पाहून भय वाटू लागलं. त्याचे पाय थरथर कापू लागले. पहलवान पुन्हा पुन्हा बोलावतोय हे पाहून तोही पाण्याच्या दिशेनं निघाला. नदीकाठी झाली होती निसरण. त्या घसरडय़ावरून पाण्यात पोचण्यापूर्वीच नासिरूद्दिन पडला. नंतर कसाबसा उठून नदीपासून दूर धावू लागला. पहलवानानं कारण विचारताच तो म्हणाला, ‘अरे, पाण्यापर्यंत पोचण्याच्या आतच मी घसरून पडलो, मग पाण्यात उतरल्यावर बुडून मरेन हे निश्चित. ते काही नाही. पोहणं शिकल्याशिवाय मी कधीही पाण्यात उतरणार नाही.’
यातला गमतीचा भाग सोडला तरी आपण असंच नाही का वागत? ‘ते जमल्याशिवाय हे करणार नाही आणि हे केल्याशिवाय ते जमणार नाही’ अशा दुष्टचक्रात आपण अनेकदा गरगरत राहतो. सुरुवात केल्याशिवाय कोणतंही काम, संपणारच कसं? अन् वडील मंडळी तर सांगतात, ‘हाती घ्याल ते तडीस न्या. कसं न्यायचं तडीस? त्यासाठी शहाणी मंडळी म्हणतात तीन गोष्टी हव्यात ‘नड-आवड अन् सवड!’ विशेष म्हणजे या तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात तसंच एकमेकांना पूरकही असतात.
जीवनात आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते. प्रसंगाची तीव्रता जाणून घेऊन त्यातून आनंदी, हुषार वृत्तीतून मार्ग काढणं. काही जण याला विनोदी वृत्ती किंवा दृष्टी म्हणतात. आध्यात्मिक क्षेत्रातले अनेक संत महात्मेही याला खूप महत्त्व देतात. जीवनातली प्रत्येक घटना गंभीरच असते असं नाही. असली तरी तिला हलकी फुलकी बाजूही असते. या बाजूनं प्रयत्न करताना आपली विनोदी वृत्ती (‘सेन्स ऑफ ह्युमर’) खूप उपयोगी पडते.
नासिरूद्दिनचीच एक गोष्ट सांगतात. एकदा उन्हातून घरी पोचला. वेळ दुपारच्या जेवणाची होती. घामानं भिजलेला सदरा त्यानं अंगणात वाळत घातला नि जेवायला बसला. इतक्यात एक बंदूक झाडल्याचा आवाज आला. नासिरूद्दिन नि त्याची पत्नी दोघेही धावत अंगणात आले पाहतात तो कुणीतरी मारलेली बंदूकीची गोळी त्यानं वाळत घातलेला सद-यातून आरपार गेली होती. ते पाहून नासिरूद्दिननं गुडघे टेकले नि आकाशाकडे हात करून प्रार्थना करून तो म्हणाला, ‘खुदा तुम बडे रहमदिल हो। आज तुमने मुङो बचाया। शुक्रिया!’ हे पाहून पत्नीनं विचारलं, ‘अशी प्रार्थना का केलीत? कारण तुम्ही तर घरात जेवत होतात. ‘हसून नासिरूद्दिन म्हणाला, ‘मी त्या सद-यात नव्हतो म्हणून तर वाचलो ना?’ म्हणून अल्लाचे आभार मानले.’जीवनाकडे पाहण्याची ही किती निर्मळ, आनंदी दृष्टी आहे नाही? एक सत्पुरुष काम संपवून घरी आले. अंगणात मुलींचा भोंडला चालू होता. पारावर एका हत्तीचं चित्र काढून त्याच्याभोवती फिरत गाणी म्हटली जात होती.
‘अस्सं माहेर सुरेख बाई खायला घालतं। अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारतं।।’ माहेर-सासरचा विवाहित स्त्रियांचा अनुभव किती हृद्य रीतीनं त्याने वर्णन केला होता. मागील अंगणात गेल्यावर पाहतात तो बायको गोठय़ात दूध काढत होती. तिचं अर्ध तोंड सुजलं होतं. ‘काय झालं गं?’ म्हणून विचारल्यावर म्हणाली, ‘अहो, दूध काढताना म्हशीनं लाथ मारली म्हणून सुजलीय तोंडाची उजवी बाजू. पण काही हरकत नाही कारण म्हैस माहेरची आहे ना?’ यावर हसावं की रडावं हे न कळून ते सत्पुरूष उद्गारले. ‘बरं झालं मी म्हशींच्या जवळ उभा नव्हतो नाही तर तीच लाथ सासरची झाली नसती का?’ यावर दोघंही खळखळून हसले. पत्नीची वेदना आणखी कमी झाली!
पण खरंच असतं का असं माहेर.. सासर? मुलीचं माहेर हे सुनेचं सासर नसतं का? मग सुनेला मुलगी मानली तर? ती माहेराहून माहेरीच येईल नाही का? असं झालं तर काय होईल? बघा विचार करून.