१ सप्टेंबर १९५५ रोजी सत्यनारायण गोएंका शिबिरात सहभागी झाले़ निवासस्थान मिळाल्यानंतर ते सयाजी उ बा खिन यांना भेटायला गेले़ तेथे त्यांना लहानशी पुस्तिका मिळाली़ त्यात कालामसुत्ताचे बोल होते़ त्यात लिहिले होते की, तुम्ही कोणतीही गोष्ट अशासाठी ग्रहण करू नका की, तिला आम्ही असे ऐकत आलो आहोत़ यासाठी ग्रहण करू नका की, ही आमची परंपरागत मान्यता आहे आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेली आहे़ यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, ही आमच्या धर्मग्रंथानुकूल आहे़
यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, ही तर्कसंगत आणि न्यायसंगत आहे़ यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, आम्ही या मान्यतेशी आसक्त झालो आहोत़ यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, हिच्या उपदेशकाचे व्यक्तित्व भव्य आहे़ यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, हिचा उपदेशक श्रमण आमचा गुरू आहे़ आम्हाला पूजनीय आहे़ जेव्हा तुम्ही स्वानुभूतीने जाणाल की हा धर्म उपदेश कुशल करणारा आहे़ निर्दोष आहे़ अनुभवी आणि समजदार लोकांनीप्रशंसित केला आहे़ स्वानुभूतीने जाणा की, संपूर्णपणे ग्रहण केल्याने तो सर्व हितकारी आहे, सुखकारी आहे़ तेव्हाच त्याला ग्रहण करून जीवनात उतरावा़ त्याच वेळी सयाजी उ बा खिन यांनी गोएंका यांना सांगितले की, भगवान गौतम बुद्ध यांचे व्यक्तिमत्त्व भव्य आणि पूज्य असूनही त्यांनी आपला उपदेश अंधविश्वासाने ग्रहण करण्यास मनाई केली़ म्हणून मी जे शिकवेन तेही अंधविश्वासाने ग्रहण करू नका़
जेव्हा तुम्ही स्वानुभूतीने स्वत: पाहाल की तो उपदेश पूर्णपणे कल्याणकारी आहे, तरच ग्रहण करा आणि त्याला आपल्या जीवनात उतरवा़ बुद्धांच्या उपदेशाला स्वानुभूतीवर उतरविण्यासाठी तुम्ही येथे आला आहात़ सयाजी उ बा खिन यांच्याशी बोलणे झाल्यानंतर गोएंका दहा दिवसीय विपश्यना शिबिरात सहभागी झाले़ या कल्याणकारी विधीने अविद्येचे आवरण तोडून मला दुसरा जन्म दिला, अशी गोएंका यांची भावना शिबिरानंतर होती़फरेदुन भुजवाला