- सदगुरू श्री वामनराव पैमाणसाला आपण सुखी व्हायचे म्हणजे नेमके काय हेच कळत नाही याचा परिणाम असा झाला की तो सुखी होण्याचा प्रयत्न करतो व होतो दु:खी. बरे केवळ स्वत: दु:खी होत नाहीत तर इतरांनाही दु:खी करतो. बघा दहशतवादी स्वत: वर तर दु:ख ओढवून घेतातच पण त्यांच्यामुळे किती लोक जखमी होतात, किती जण मृत्यूमुखी पडतात हे सगळं पाहिले तर एक माणूस किती माणसांना दु:ख देवू शकतो हे तुमच्या लक्षात येईल.पुर्वीच्या लढाया तरी ब-या होत्या. त्या घराबाहेर तरी होत असत पण आता तर घराघरातच लढाया होताना दिसतात. आता जर महायुध्द झाले तर आपण जिंकलो म्हणून सांगायलाही कुणी उरणार नाही. हरणाराही मरणार व जिंकणारा मरणार.
माणूस सुखी होण्यासाठी प्रयत्न करतो पण होतो दु:खी कारण त्याच्या प्रयत्नांची दिशाच चुकलेली आहे. दिशा चुकली की अवदशा प्राप्त होते म्हणून दिशा चुकता कामा नये. सदगुरु काय करतात तर सदगुरु योग्य दिशा देण्याचे काम करतात. सदगुरुंचे जे महत्व आहे ते इथे आहे. सदगुरु जी दिशा देतात ती दिशा महत्वाची असते. सदगुरुंनी दिलेल्या दिशेने आपली इंद्रिये जेव्हा वळतात तेव्हा त्याला एकादशी असे म्हणतात. एकादश इंद्रिये जेव्हा एका दिशेने जातात तेव्हा ती खरी एकादशी असते.
तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे, “घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख,ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण,मना तेथ धाव घेई राही विठोबाचे पायी, तुका म्हणे घे रे जीवा नको सोडू या केशवा” हया अभंगात सर्व इंद्रियांची एकच दिशा आहे व ती दिशा म्हणजे विठ्ठल. तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे सर्व इंद्रिये एका दिशेने वळली की तीच एकादशी. आणि अशी एकादशी आपल्याला करता आली पाहिजे. आज आपण एकादशी करतो व दुप्पट खातो. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे.. तुला देवाने वाचा दिली आहे ना ती कशासाठी तर विठोबाचे नाम घेण्यासाठी किंवा चांगले बोलण्यासाठी. दोघांपैकी एक केलेस तरी चालेल. जर कोणी म्हणाले आम्ही नास्तिक आहोत आम्ही देवाचे नाम घेणार नाही पण चांगले बोलू तर चालेल तेही उत्तम आहे. शुभ बोल रे ना-या असे आपल्या वाडवडिल म्हणायचे.
शुभ बोलणे हेच भजन, शुभ कर्म करणे हेच पूजन, शुभ चिंतन करणे हेच ध्यान, शुभ इच्छा करणे हीच प्रार्थना हा आमच्या जीवनविद्येचा सिध्दांतच आहे. शेवटी देवाचे भजन, पूजन, ध्यान, प्रार्थना कशासाठी करतो तर देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. देवाला प्रसन्न कशासाठी करून घेतो तर त्याने आपल्याला सुख देण्यासाठी. तो आपल्याला सुख कधी देणार तर आपण जेव्हा त्याला प्रसन्न करणार तेव्हा.त्यामुळे शुभ बोला.