- हभप भरतबुवा रामदासी (बीड)
संसारसिंधू तरुन जाण्यासाठी विचार तरी कोणता करावयाचा..? विचार आणि भवसिंधू याचा संबंध तरी कोणता..? तर या प्रश्नाचे उत्तर असे की,
अगा जे झालेचि नाही । तयाची वार्ता पुससी कायी ॥
हा प्रपंच मिथ्या आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ तुम्ही त्याला जसे समजता तसा तो नाही. आम्हाला तो सत्य भासतो पण तो सत्य नाही. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात -
प्रपंच एक झाला होता । हेंच समूळचि मिथ्या वार्ता ॥पुढे होईल मागुता । हे कल्पांतीहि घडे ना ॥
जर प्रपंच मिथ्या आहे तर तो आम्हाला सत्य का भासतो..?तर संत म्हणतात -
रज्जू सर्पाकार भासीयेले जगडंबर ।
दोरीच्या ठिकाणी भासणारा साप नाहीसा होण्यासाठी तो साप काठीने मारावा लागतो का..? अहो.! त्याला मारण्यासाठी प्रकाशाची उपस्थिती पुरे..! एकदा का प्रकाश त्याठिकाणी निर्माण झाला की तिथे साप नाहीच हे कळते. त्याप्रमाणे क्षणोक्षणी विचार केला की भवसिंधुतून सहज तरुन जाता येते कारण जन्म आणि मरण हे नाहीच याचे ज्ञान होते.
एका सज्जन माणसाचा भूत, प्रेत, पिशाच्च यावर मुळीच विश्वास नव्हता. त्याचे धैर्य पाहण्याकरिता एका सज्जन माणसाने एकदा त्याच्याबरोबर पैज लावली. अमावास्येच्या दिवशी रात्री बारा वाजता स्मशानभूमीत जाऊन तू जर त्याठिकाणी लाकडाची खुंटी ठोकून आला तर आम्ही तुला खरंच निर्भय समजू..! ठरलं..! हा एकटाच स्मशानभूमीत निघाला पण जाताना पिशाच्चाची कल्पना डोक्यात शिरली, कसातरी स्मशानात पोचला, खुंटी ठोकली व निघतांना त्याचे धोतर त्याच खुंटीला अडकले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करणार तोच तोंडावर पडला. आपल्याला पिशाच्चाने झडपले या विचाराने तो बेशुद्ध पडला. बराच वेळ झाला तरी हा परत कसा येईना..? म्हणून त्याचा मित्र दिवा घेऊन स्मशानात गेला. त्याला सावध केले व खुंटीला अडकलेले धोतर दाखवले. त्याबरोबर त्याची भीती दूर पळाली. भीती नाहिशी होऊन तो पूर्वस्थितीवर आला. यावरुन विचार हाच बंधनाला कारण आहे हे सिद्ध होते. विचारानेच बंधन व विचारानेच मुक्त होता येते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात -
केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥
खरं तर विचार तरी कोणता करावा..? आपण पुढील लेखात याचे चिंतन करू..?
( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या भ्रमणध्वनी ९४२१३४४९६० )