- वामनराव देशपांडेपार्था, ज्या साधक भक्ताने आपल्या चंचल मनाला आणि विषयासक्त इंद्रियांना जिंकून घेतलेले आहे, जो साधनेतच मग्न आहे, असा श्रद्धावान साधक जो असतो ना, त्यालाच शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. तोच श्रद्धावान ज्ञानी पुरुषोत्तम शांतीचा अनुभव घेतो. भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला प्रत्यक्ष युद्धभूमीवर आंतरिक मन:शांतीची दर्शनवाट दाखवली. माणसापाशी परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा हवी. दृढ विश्वास हवा. ज्ञानभारला विवेक हवा. वैराग्याचे वरदान लाभायला हवे. परमेश्वर जरी मर्त्य दृष्टीचा विषय नसला तरी परमेश्वरी तत्त्व सत्य आहे आणि त्यानेच निर्माण केलेले हे मायावी विश्व, जे आपण दृष्टीने प्रत्यक्ष अनुभवतो, ते असत्य आहे. भगवंतांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,अश्रद्धाना: पुरुषा धर्मस्यास्य परन्तप।अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि।।पार्था, तू दोषदृष्टीरहित आहेस म्हणून तुला पे्रमाने माझ्या अंत:करणातले गुह्य तत्त्व सांगायला सतत उत्सुक असतो. तुझे अशुभापासून रक्षण करणारे, तुला मुक्ती अर्पण करणारे हे गोपनीय ज्ञान ध्यानपूर्वक श्रवण कर. हे श्रेष्ठ तत्त्वज्ञान, सर्वसाधारण अशी जी असंख्य माणसे या विश्वात देहभावनेने जगत आहेत ना, ते दुर्दैवी जीव या सहजसोप्या तत्त्वाचे श्रवणच करीत नाहीत. कारण ती माणसे मूलत: अश्रद्धेय वृत्तीची असतात. त्यांची धर्मावर श्रद्धा नाही. परमेश्वर सत्य आहे यावर विश्वास नाही. या मर्त्य दृश्य विश्वावर श्रद्धेय अंत:करणाने आंधळा विश्वास ठेवणारी, माझ्या अस्तित्वाचा विसर पडलेली ही दुर्दैवी माणसे मला कधीच प्राप्त करून न घेता, जन्म-मृत्यूच्या गरागरा फिरणाऱ्या चक्रावर फिरत राहतात. वेगवेगळ्या योनीत प्रवेश करीत जगत-मरत राहतात.
परमेश्वर जरी मर्त्य दृष्टीचा विषय नसला तरी परमेश्वरी तत्त्व सत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 4:49 AM