- डॉ. दत्ता कोहीनकर
पहिली घटना - उच्चशिक्षित, रूबाबदार, देखणी श्वेता नैराश्याने ग्रासल्यामुळे भेटावयास आली होती. त्यातच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कारण होते पतीचा संशयी स्वभाव व त्यातच तिच्या मित्राचा तिची विचारपूस करण्यासाठी घरी आलेला फोन. त्यामुळे तिच्या पतीने तिला केलेली भयंकर मारहाण व मानसिक कुचंबणा.
दुसरी घटना - रोज गुपचुप पतीचा मोबाईल चेक करणाऱ्या स्नेहाला पतीच्या मेसेज बॉक्समध्ये त्याच्या आॅफिसमधील मैत्रिणीचा ऌङ्म६ ं१ी ८ङ्म४ ? असा मेसेज वाचायला मिळाला. त्यावरून स्नेहाने पतीला धारेवर धरून त्याची खूप अवहेलना केली. त्यामुळे दोघात खूप भांडणे झाली. परिणामी स्नेहाने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.
सध्या पती-पत्नी नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर असल्यामुळे, तसेच अविश्वासामुळे आज बरेचसे संसार विस्कटताना दिसत आहेत. बऱ्याच कुटुंबामध्ये विश्वास नावाच्या पवित्रतेला आज ग्रहण लागले आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत घरात ८ ते १० लोक असायचे. जीवन सुटसुटीत होेते. घरातील लोकांमध्ये भावभावना व्यक्त करायला वाव होता. एकमेकांशी बोलून मन हलके करता येई. सल्लामसलत, आपुलकी, प्रेम, सुरक्षितता, आदरभाव, आपलेपणा यासारख्या भावनांना घरातील मंडळींचा प्रतिसाद मिळून भावभावनांचे संतुलन होत असे. आज जग वेगाने पुढे चालले आहे, बदल फार वेगाने होतोय. परंतु, काही जुन्या चालीरीती मात्र लोक सोडायला तयार नाहीत. त्यामुळे कांदा-पोहे व चहाच्या एक तासाच्या बैठकीतच बरीचशी लग्न ठरतात. पूर्वीच्या काळी मानसिक स्थैर्यामुळे हीच लग्नं शेवटपर्यंत टिकत असत. आता जीवनमान उंचावताना स्पर्धेशी तोंड देताना माणसांच्या मनाची अस्थिरता वाढत आहे. पती-पत्नीमधील एकमेकांच्या आवडीनिवडीतील फरक, पिढयानपिढया चालत आलेल्या विचारांचा पगडा, अवास्तव मागण्या, अहंकार, तणावग्रस्त मन, जुळवून न घेण्याची वृत्ती, एकत्र कुटुंबपद्धतीचा अभाव यामुळे नात्यात कटुता येत आहे. अशावेळी भावभावना व्यक्त करण्यासाठी चांगल्या मित्र-मैत्रिणींची गरज भासते. त्यांच्याशी बोलून मन हलके करता येते, सुखदु:ख व्यक्त करता येते. कारण मन मोकळे केले नाही व मनातील भावना तशाच दाबून ठेवल्या, तर ही दमन केलेली ऊर्जा नैराश्याकडे नेते. मनोरूग्णांचा अभ्यास केला असता दमन केलेल्या भावभावना हे एक प्रमुख कारण आढळते.
मित्र-मैत्रीणींबरोबर घालवलेला वेळ, मारलेल्या गप्पा, केलेली कामे, बघितलेली वेगवेगळी स्थळे, नाटके / सिनेमे, पुस्तके / राजकारण इ. विषयावर व घरगुती प्रश्नांवर केलेल्या चर्चा यातून एक प्रकारची मानसिक उर्जा मिळते. त्यातून मिळालेला आनंद, शांतता, खुशी या सगळयांचा ओघ आपल्या कुटूंबाकडेच वळतो. आपले बारीक-सारीक ताण, कटकटी, कंटाळा, चिडचिड, फस्ट्रेशन्स, त्रागे आपल्या मित्र-मैत्रीणींच्या सहवासात व गप्पात वाहून जातात. प्रसन्न व मोकळे आनंदी मन, नवरा-बायकोचे नाते अधिकच बळकट करते. म्हणून मित्र-मैत्रीण या नात्याला देखील महत्व आहे. मात्र हे नाते निभावताना या नात्याबाबत पारदर्शकता ठेवली पाहिजे. त्यात लक्ष्मणरेषा आखुन घ्यायला हवी. या नात्यात पावित्र्य व शुद्धता, व पती-पत्नी यांचा एकमेकांवरचा विश्वास असेल तर संसारात सुखाचा बहर येईल. त्यामुळे पती-पत्नीने एकमेकांना आदर, व्यक्तीस्वातंत्र्य, पुरेशी मोकळीक देऊन, विश्वास बळकट केला व प्रत्येक नात्यात लक्ष्मणरेषा आखली तर जगणे सुंदर होईल.---(लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत.)