- शैलजा शेवडेअन्नपूर्णा म्हणजे पार्वती. संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य ती करते. म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात. आदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णास्तोत्र हे अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आहे. आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. हातात मोठी पळी घेतलेली अन्नपूर्णा. काय हेतू असतो त्यात. तर मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी, ‘हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते, त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून, सुंदर भावनेने अन्न बनविले आहे, त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा होवो. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही, याची मी काळजी घेवो. भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो.’आदी शंकराचार्य आपल्या स्तोत्रात म्हणतात, हे अन्नपूर्णे, तू व्यापक आहेस. तू सर्वजनांची स्वामिनी आहेस. तू नेहमीच कल्याण करणारी आहेस. तू शक्ती देणारी आहेस, आरोग्य देणारी आहेस...अन्नपूर्णे सदापूर्णे शर प्राणवल्लभे।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वति॥माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वर:।बान्धवा: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम॥आई अन्नपूर्णे, तू सदा पूर्ण आहेस. शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस. मला ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ.हे देवी पार्वती, तू माझी आई आहेस. महादेव माझा पिता आहे. सारे शिवभक्त माझे बांधव आहेत. त्रिभुवन हा माझा स्वदेश आहे.
अन्नपूर्णा स्तोत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 5:04 AM