मनाला एखाद्या गोष्टीची गोडी लागली की, ते मन तेथे चिटकून राहाते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
‘का जे यया मनाचे एक निके। जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके। म्हणून अनुभव सुखचि कवतिके। दावित जाईजे।’
म्हणून मानवी मनाला आत्मानुभवासारखे सुखच वारंवार दाखवित चला. आपल्या मनाला जन्मल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा लावला नाही तर ते स्थिर होणार नाही. स्थिर मनाशिवाय मनात शांती येणार नाही. म्हणून मनाचा निग्रह महत्त्वाचा आहे. कारण मनाचा स्वभाव चंचल आहे. मनाचे मूलभूत सात्त्विकपण जन्म-जन्मांतरीच्या रजोगुण-तमोगुणांच्या प्रभावाने लुप्त झालेले असते. स्वार्थी प्रवृतीतून निर्माण झालेले विकार माणसाला झाकोळून टाकतात. तेच संस्कार मनावर होतात. संस्कारी मन जगात कल्याणकारी कार्य करायला प्रवृत्त करते. कोणत्या परिस्थितीत कोणाचे मनावर किती आघात होतात, किती सुख होते याचा विचार संस्कारी मन करू शकते. आपल्या मनाला चांगले किंवा वाईट वळण लावणे आपल्यावरच आहे.
समर्थ रामदास स्वामींनीही मनाला सज्जन म्हणून समजाविले. मनाला विनवणी केली, ‘तू स्वार्थात, विषयभोगात, लबाड-लांछनतेत अडकू नकोस, तू सज्जन आहेस. सज्जन माणसाचे लक्षण असे नसते. म्हणून तू भक्तिपंथाकडे वळ, तेथेच तू शांत होशील. कारण सर्वसामान्यांच्या मनोवृत्तीला भक्तिपंथ जास्त आवडतो. म्हणून त्या मार्गाने गेल्यास मना कल्याण होईल. मनाचे कल्याण झाल्यास बुद्धी सतेज होते. शरीर स्वच्छ व हलके झाल्यासारखे वाटते. जीवन शुद्ध, सात्त्विक व पवित्र होते. आचार-विचारातील पवित्रता वाढते. मनातील विचारतरंग बदलून जातात. नको त्या गोष्टी मनात येत नाहीत. नाहीतर इतर वेळेला मन काहीपण चिंतन करत असते. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी म्हण आहे. माणसाचे मन केव्हा काय चिंतन करेल ते सांगताच येत नाही. अनेक विचारांनी मन गोंधळून जाते. त्यामुळे मनाने चिंतन केले पाहिजे. चिंतन हा मनाचा विषय आहे. चिंतन करताना दुष्टवासना आणि पापबुद्धी यांना मनात थारा मिळता कामा नये. मनात येणाऱ्या वाईट वासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. क्रमाक्रमाने मन शुद्ध करायचे असले तर धर्म व नीतीचा अवलंब करा. मनाला चांगल्या विचारांची सवय लावा. कारण माणसाच्या हातून घडणाऱ्या कृतीचा विचार सर्वप्रथम मनात येतो. मग बुद्धी-इच्छा आणि क्रिया असा क्रम आढळून येतो. त्यामुळे मनाला संस्कारशील बनवा व दुष्टप्रवृत्तीवर विजय मिळवा.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)