पितृपक्षात पितृलोकांतून सर्व पितर पृथ्वीवर येतात व आपले वंशज आपल्यासाठी काय करतात, हे पाहतात, असे आपल्याकडे समजतात. संपूर्णवर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पितरांचे श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशाअनेक कारणांमुळे जे कुणी पितरांचे श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध करून पितरांच्या ऋणातून उतराई होऊ शकतात व त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकतात. सर्वपित्री अमावास्येला एवढे महत्त्व का प्राप्त झाले, याची पौराणिक कथा जाणून घेऊ या-
श्रेष्ठ पितृ अग्निष्वात व बर्हिषपद यांची मानसकन्या अक्षोदा हिने घोर तपश्चर्या केली. देवतांच्या एक हजार वर्षांपर्यंत ती तप करीत होती.तिच्या तेजाने पितृलोकही प्रकाशमान झाला. त्यामुळे अक्षोदावर सर्व श्रेष्ठ पितृगण प्रसन्न झाले व तिला वर माग म्हणाले. तिचे त्यांच्याबोलण्याकडे लक्ष नव्हते. ती तेथील तेजस्वी पितृ अमावसु यांना न्याहाळत होती. तिने वरच मागितला की, मी आपल्याबरोबर राहण्याचा आनंद उपभोगूइच्छिते.
तिच्या या वक्तव्याने सर्व पितृ संतप्त झाले व त्यांनी तिला शाप दिला की, ती पितृ लोकांतून पतित होऊन पृथ्वीवर जाईल. या शापानंतर ती गयावया करूलागली. त्यामुळे तिला उ:शाप दिला. आपले तेज व सौंदर्याने स्वर्गातील अप्सरांनाही फिके पाडणा-या अक्षोदाचा प्रस्ताव नाकारणारे अमावसु यांची नंतर सर्व पितरांनी प्रशंसा केली व त्यांना वरदान दिले. सर्व पितृगण म्हणाले, हे अमावसु, तुम्ही तुमचे मन भटकू दिले नाही. त्यामुळे आजपासून या तिथीला अमावसु हे नाव देत आहोत. जो कोणी मनुष्य वर्षभर कधीच श्राद्ध-तर्पण करणार नाही, करू शकणार नाही, त्याने या तिथीला श्राद्ध केले तर सर्व तिथींना त्याने श्राद्ध केल्याचे फळ प्राप्त होईल. तेव्हापासून आजच्या या तिथीला सर्वपित्री अमावास्या असे नामाभिधान प्राप्त झाले. त्यामुळे सर्व पितरांचे श्राद्ध करण्यासाठी ही तिथी महापुण्यदायक मानली गेली आहे.
गजच्छाया योग
हंसे करस्थिते या तु अमावास्या करान्वितासा ज्ञेया कुंजरच्छाया इति बौधायनोब्रवीत
अर्थ : सूर्य हस्त नक्षत्रात असताना अमावास्या आली व त्या दिवशी चंद्रही हस्त नक्षत्रात असेल तर त्याला गजच्छाया योग म्हणतात. हा भाद्रपद कृष्णअमावास्येलाच येऊ शकतो.
यंदा २०१८ साली गजच्छाया योग आला आहे. त्यामुळे या वर्षीच्या सर्वपित्री अमावास्येला पितरांच्या नावाने पिंडदान, तर्पण करणे महापुण्यदायक असणारआहे.
पितृ पक्षात कोणा-कोणाचे स्मरण होते?
पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारा व्यक्तीहा त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैैकी जे मृत झाले असतील त्यांचेही तो स्मरण करीत असतो. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही, करीत नाही, त्यांच्यासाठीही तो धर्मकार्य करीत असतो. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीहीकेले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पितर तृप्त होतात.- संकलन : सुमंत अयाचित