- मोहनबुवा रामदासी
शक्तीने मिळती राज्ये।युक्तीने यत्न होतसे।शक्ती युक्ती जये ठायी।तेथे श्रीमंत नांदती।समर्थांनी शरीराच्या शक्ती संवर्धनावर विशेष भर दिला आहे. शरीरास यंत्र जाणावे, असा उपदेश समर्थ करतात. शरीर हे सर्व कार्यासाठी एक साधन, माध्यम आहे. साधनच जर शक्तीसंपन्न नसेल, तर या शरीराच्या माध्यमातून होणारी कामे ही उत्तम दर्जाची होऊ शकत नाहीत. म्हणूनच ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्’ असे म्हटले आहे. शरीर सुदृढ व निरोगी असेल, तर मनात येणारा प्रत्येक विचार हा एक वेगळी ऊर्जाशक्ती घेऊनच बाहेर पडतो. शरीराच्या संवर्धनासाठी सूर्यनमस्कार व मनाच्या संवर्धनासाठी मनोबोध अत्यंत आवश्यक आहे.
विचारांमधील शक्ती विचारांनीच वाढते. अविचाराने सद्विचारांचा क्षय होतो. म्हणून कधीही अविचार करू नये. शरीराची शक्ती पौष्टिक पदार्थ, भाजीपाला व फळांनी वाढविता येते; पण मनाचे सामर्थ्य व शक्ती ज्याने हा भाजीपाला व फळे निर्माण केली त्याच्या नामानेच म्हणजेच सद्विचारानेच मनाचे सामर्थ्य वाढेल. म्हणून मनात येणारा प्रत्येक विचार हा बुद्धीच्या कसोटीवर तपासता आला पाहिजे. मनातील अविवेक आणि अविचारांची स्पंदने हाय बी.पी. आणि शुगरला कारणीभूत आहेत. विचारांची उंची राखावी व संयमी वृत्ती असावी; पण अट्टाहास व दुराग्रह नसावा. सध्याचा जमाना हा फास्टफूडचा आहे; त्यामुळे रोगराई, व्हायरस फारच पसरत आहे.
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही; पण त्याची आस जास्ती असू नये, नाहीतर मग वाद होतात. प्रकृतीचे सगळे नियम झुगारून आणि धाब्यावर बसवून ढाब्यावर जेवायची सवय लागली. ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्’ या शरीर यंत्रासारखे यंत्र आणीक नाही! तोंडातल्या बत्तिशीच्या एवढे वर्ष काम देणारा इंपोरटेड अडकित्ता अजून तयार झाला नाही म्हणून या शरीरसामर्थ्याबरोबर मनाचेही सामर्थ्य वाढवा.