माणसाचे मन आणि मानवी नातेसंबंधी भावबंधात आता जिव्हाळा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. २१ व्या शतकात या स्पर्धेच्या युगात माणसाचे माणसाकडे दुर्लक्ष होत आहे. कुटुंब संस्थेचा होत असलेला ऱ्हास उघड्या डोळ्यांनी सान -थोरांना दिसत आहे. ग्रामीण क्षेत्रातील लडीवाळपणा जपणारी संस्कृतीसुद्धा प्रत्ययी कमी होत आहे. अंधार चोहीकडून दाटलेला आणि स्रेह, ममता, जिव्हाळ्याचे दिवे विझायला आले आहेत. यापुढील काळ किती भयानक असेल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. नातेगोते संपत्तीच्या तराजूत तोलल्या जात असल्याने काळ मोठा कठीण भासणार आहे. प्रत्येकाने यावर विचार करणे काळाची गरज आहे.पेडपर दौलत की कलियॉ न होगी,तो रिस्तोंके फुल भी कम आयेंगे।आज कुटुंब हे बेसूर होत चाललेले आहेत. जसे पेरावे तसे उगवते, हा निसर्ग नियम आहे. ज्वारी पेरल्यावर गव्हाची अपेक्षा कोणताही शेतकरी करीत नाही. प्रापंचिक जीवनात मात्र या नियमाचे आपणाला विस्मरण होत आहे. लोक माझ्याशी चांगले वागत नाही, अशी तक्रार आपण नेहमी ऐकतो; पण लोकांशी मी कसा वागतो, याचेही आत्मचिंतन करणे आवश्यकच आहे. लहान-लहान गोष्टीवरून चिडण्याची काही व्यक्तींची सवय असते. त्यामुळे मानसिक तणाव येतो. त्याकरिता दुसऱ्यांना कठोर बोलण्याचे टाळावे.वसे शांती ज्या घरी। तेथे लक्ष्मी वास करी।सदाचाराची कास धरावी आणि त्यायोगे ऐहिक वैभव प्राप्त करावे आणि जे वैभव मिळाले त्याची आसक्ती धरू नये.नको म्हणू माझे माझे। तुझे नसे काही।हाक येता यमराजाची, सर्व इथे राही।।संसारासाठी सुवर्ण पाहिजे, पैसा पाहिजे; पण हे आपल्याबरोबर येणार नाही. या कठोर सत्याचे विस्मरण कधीही होऊ देऊ नये. संतांची वाणी मानवाला वारंवार जाणीव करून देत असते.साधुसंत सांगून गेले, जरा लक्ष देई।सावधान होई वेड्या, सावधान होई।।माणसाला अमर करणारी संजीवनी अजून तरी निर्माण झाली नाही. विज्ञानात कितीही प्रगती झाली तरी या बाबतीत यश येणार नाही. म्हणून जीवन आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण सुवर्णाचा व्हावा, दृष्टी व्यापक व्हावी. एकदा आलेले तारुण्य पुन्हा कधी येत नाही आणि एकदा आलेले म्हातारपण पुन्हा कधीच जात नाही. माणसाने सत्कृत्य करीत राहावे. त्याने आपल्या जीवनात विधायक कार्याचा प्रसार करावा. अलौकिक पुरुष होणे आपल्या हातात नाही; परंतु सद्विचारांची लहान-मोठी वर्तुळे निर्माण करणे आपल्या हातात आहे. चालू काळात जीवनाचे प्रयोजन काय आहे, हे माणसाने जाणावे व वेळ येईल तेव्हा शांतपणे या प्रपंचरूपी कुरुक्षेत्राचा निरोप घ्यावा.प्राप्त कर्माचरणी निपुण। भक्तीज्ञाने सुसंपन्न।अखंड करी सोहंध्यान। कृत्यार्थ जीवन होय त्याचे।।
- ज्ञानेश्वर मिरगेशेगाव, जि. बुलडाणा