माणूस ज्या जगात राहतो, त्या जगाबद्दल, त्यातल्या त्याच्या जगण्याबद्दलचा एक यशस्वी सिद्धांतत इस्लामने कुरआनीय तत्वज्ञनाच्या माध्यमातून मांडला आहे. मानवी समाजातल्या स्थित्यंतरांचा कुरआनइतका सूक्ष्म अभ्यास अन्य कोणत्या ग्रंथात आढळत नाही. त्या स्थित्यंतराचा वेध घेतल्यानंतर समाजात निर्माण झालेल्या व निर्माण होऊ शकणाºया समस्यांचे निराकरण इस्लामी तत्वज्ञानाने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातही भविष्याचा वेध घेत ‘इज्तेहादची’ (इस्लामी विवेकाची) प्रेरणा देखील दिली आहे. इतिहास म्हणजे माणसांचा अनुभव व त्याचा संचय असतो. इस्लामच्या तत्वज्ञानात या समग्र अनुभवांचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे इस्लामी विचारधारा मानवी अनुभवावर आधारित मानवकेंद्री हित प्रतिपादित करणारी आहे. प्रेषितांच्या विचारांचे केंद्रदेखील ते राहत होते, तो मानवी समाज होता. त्यांच्या प्रत्येक हदिसमधून समाजक्रांतीनंतर जन्मणाºया समाजाला संहिता प्रदान करण्याची धडपड अधोरेखित होते. नव्या समाजाचा प्रारंभ कोºया पाटीवर होणार नाही. याची पुरेपूर काळजी इस्लामी तत्वज्ञानाने घेतली.
माणसाचे शोषण नाकारल्यानंतर त्याच्या उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. उत्पादित होणाºया वस्तूचे निर्मितीमूल्य काढून त्याचे बाजारमूल्ये व त्याच्या उत्पादनासाठी खर्ची पडलेल्या श्रममूल्याचे विवेचन देखील इस्लामने केले आहे. समन्वयशील अर्थव्यवस्थेतून अभिजात समतेचे तत्व दिले आहे. हुकुमशाही सक्तीने समाज निर्माण करण्यापेक्षा नैतिक प्रबोधनाच्या आत्मजाणीवेतून समाजनिर्मितीचे तत्व सांगितले आहे. कुरआनमध्ये ज्या आयती आहेत, त्या प्रत्येक आयतीमागे परिवर्तनाचा विचार दडला आहे. मक्का शहरात कोणत्याही प्रकारचे शासन अथवा प्रशासन इस्लामच्या पूर्वी अस्तित्वात नव्हते. मात्र इस्लामच्या नंतर सैनिकांपासून कर गोळा करणाºया महसुली अधिकाºयांपर्यंत अनेक अधिकारी नेमले गेले. त्या अधिकाºयांच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्थेला निर्धारित करण्याची भूमिका देखील इस्लामने मांडली आहे. प्रेषित मोहम्मद (स.) यांनी शासनाची कर्तव्ये सांगितली. त्यात समता आणि त्याची प्रस्थापना याला त्यांनी मोठ्या प्रमाणात महत्त्व दिले.
चळवळीच्या मुळाशी तत्वज्ञान असावे लागते. इस्लामच्या मुळाशी कुरआनप्रणित तत्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. नव्या ज्ञानाची असूया ही तत्वज्ञानाच्या उगमाची प्राथमिक गरज आहे. प्राप्त परिस्थितीतला सामाजिक अंधकार, आणि त्या अंधाराला भेदणारा हिरा नावाच्या गुहेतला ‘इकरा’ या ज्ञानाभिलाषी सर्जनात्मक शब्दातून झालेला अनुबोध. प्रेषित मोहम्मद (स.) यांनी चिंतनातून अप्रक्षिप्त चैतन्याचा शोध घेताना भौतिक परिस्थितीची जाणीव उराशी बाळगली होती. त्यामुळेच इस्लामी समाजक्रांतीच्या नंतर अरबी समाजाच्या उत्पादन व्यवस्थेत प्रचंड उलथापालथ झाली. मोडतोड झाली. त्यातून समतामुलक इस्लामी अर्थक्रांतीने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. हे स्थान निर्माण करण्यामागे प्रत्येक वस्तूचा नव्याने अर्थ लावण्याची इस्लामी तत्वज्ञानाची धारणा होती. त्यातून मग गरिबांचे सामाजिक जीवनमान उंचवण्यासाठी जकातसारखा सामाजिक कर अदा करणे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य बनले. त्यांनी गरीबांना आपल्या संपत्तीतून आर्थिक मदत देऊन समाजातील आर्थिक विषमता संपवण्यासाठी श्रीमंतांना प्रेरित केले. त्यामुळे अवघ्या काही वर्षातच मक्का शहरातील आर्थिक विषमता संपली. गरीब आणि श्रीमंत या वर्गात समन्वय निर्माण होऊन अर्थव्यवस्थेतून मूठभर लोकांचे हित जपले जाण्याची अघोरी पद्धत बंद झाली. इस्लामने व्यापार, सामाजिक व्यवहार, नैतिक आचरण यासह अनेक मूल्यांची नव्याने व्याख्या केली. - आसिफ इक्बाल