- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआत्मग्लानी किंवा व्यर्थ विचार करणे या गोेष्टी मनाला दुर्बल बनवितात. मनाला दुर्बल बनू न देता त्यावर संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. निकृष्ट भावना आणि विचार यांचा सामना करण्यासाठी मनाला प्रवृत्त करा. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्साहाने कार्य करीत राहिले पाहिजे. मनावर संयम ठेवला पाहिजे. जास्तीत जास्त चांगला विचार करा. मनाला शुभचिंतन करण्याची सवय लावायला हवी. तुम्ही मनाला जेवढे चांगले ठेवाल तेवढा तुमचा आध्यात्मिक विकास होत असतो. जर गायीला चांगला पौष्टिक आहार दिला तर ती अधिक दूध देते, तिच्या दुधामध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे मनाला चांगला आहार म्हणजे सद्विचारांचा आहार दिला तर मन प्रसन्न होईल. प्रसन्न मन शांतीला जन्म देते, त्या मनामध्ये कायम शांती वास करते. ध्यानधारणा, प्रार्थना, जप हा मनाला प्रसन्न ठेवण्याचा सात्त्विक आहार आहे. त्यामुळे मनाची स्थिती-गती यावर नियंत्रण ठेवता येते. याने मनावर करडी नजर ठेवता येते. त्याच्या गतिविधीचा विचार करता येतो. मनावर कंट्रोल ठेवला की मन स्वयंस्थिर होते आणि तुमच्या कार्याला चांगली गती मिळते. तुम्हाला श्वासावर चांगले नियंत्रण ठेवता येते. श्वासावर नियंत्रण केल्याने प्राणायाम साधला जातो. मनाच्या भावनेवरच प्राणायामची स्थिती अवलंबून असते. ती साध्य झाल्यास मन सजग बनते. सजग झालेले मन आपल्या श्वास- उच्छ्वासात बदल घडवून आणते.मग चित्तशुद्धीचा मार्ग मोकळा होतो.कारण चित्तशुद्धी आध्यात्मिक मार्गात असणाऱ्या माणसाला सर्वाेच्च स्थिती गाठून देते. चित्तशुद्धी झाल्याशिवाय आत्म्यामध्ये गोपाल निवास करीत नाही. चित्ताची अवस्था निरामय असावी लागते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात,तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ।येऊनी गोपाल राहे तिथे।।चित्त निर्मळ झाल्याशिवाय अध्यात्माचा मार्ग मोकळा होत नाही. चित्त स्थिर ठेवण्यात मनाचा मोठा वाटा असतो. नव्हे मनाचाच एक भाग चित्त आहे. म्हणून या मनाची परिस्थिती मनावरच अवलंबून आहे.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)
मनाला शुभचिंतनाची सवय लावणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 8:16 AM