कोरोनाचे मोठे संकट आपल्यावर आले आहे. या कालखंडात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचे आणि आदेशांचे पालन करायला हवे. या कालखंडात सद्विचारांचे आचरण आणि कल्याण होईल, असे आपले आवडते छंद जोपासायला हवेत. मन प्रसन्न ठेवणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. प्रसन्न मनानेच सर्व विकारांवर मात करता येणार आहे.
जगभरात सध्या कोरोनाची दहशत पसरली आहे. वैश्विक संकट आपल्यावर आले आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे. आलेल्या संकटाला न घाबरता, माणसाने धार्मिक आणि अध्यात्मिक साधनेने मन प्रसन्न ठेवायला हवे. ‘‘मन करा रे प्रसन्न...’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम आपल्यामध्ये निर्माण झालेली भीती संपवायला हवी. यापूर्वी प्लेग, कॉलरा अशा अनेक साथी आल्या आणि आज त्यांचे नामोनिशानही नाही. त्यामुळे कोरोनाही संपणार आहे. मात्र, आहे त्या कालखंडात आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच घरी बसून चिंतन करायला हवे. कल्याण होईल, अशी आवड जोपासायला हवी. चिंता नव्हे.शरीर स्वास्थ असेल तर मन स्वास्थ राहील आणि शरीर स्वस्थ नसेल तर मन स्वास्थ, कसे राहणार? आपल्याला काय होईल? याविषयीचीच माणसाच्या मनात भीती आणि चिंता आहे. काय होईल, याचा भ्रमही आहे. कोरोना शेजारच्याला झाला मग मलाही होईल का? याची भीती आहे. खरे तर, अनेक लोक याच भीतीखाली वावरत आहेत. आणि अशी भीती बाळगली तर मन शांत कसे राहणार? माझ्या डोक्यावर जर कोणी टांगती तलवार ठेवली तर मन:शांती कशी लाभणार? खरे तर हा अत्यंत अवघड प्रश्न आहे. यावर मात करण्यासाठी संत चोखामेळा यांचा सुंदर अभंग आहे.
‘‘एकांती बैसोनि करी गुजगोष्टी। धरोनी हनुवटी बुझवित॥ नको बा मानु संसाराचा शीण। तुज एक खुण सांगतो मी॥ होणार ते होय न होणार ते न होय। सुख-दु:ख पाहे कर्माधिन॥ देव म्हणे चोख्या नको मानु शीण। तुज माझी आण भक्तराया॥, असा संत चोखामेळा यांनी अभंगात सांगितले आहे.जर जीवनात सिद्धांत ठरलेला आहे, तर मग एखाद्या गोष्टीबद्दल किती काळजी बाळगायची. मन शांत ठेवा, हे सांगणं जेवढं कठीण आहे, तेवढं प्रत्यक्षातून कृतीत आणणे अवघड आहे. दुसरी गोष्ट मन इतके चंचल आहे की, ते सुरुवातीला चांगल्यांचे चिंतन करण्याऐवजी वाईटांचेच चिंतन अधिक करीत असते. मन किती चंचल आहे, हे संत एकनाथ महाराजांनी आपल्या एका रचनेत सांगितले आहे. जोपर्यंत तुझी कृपा आमच्यावर होत नाही, तोपर्यंत हे मन शांत होणार नाही, हे संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. कोरोनाची व्याप्ती एवढी मोठी आहे की, तो केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर त्याने सगळे जग आपल्या कवेत घेतले आहे. अशावेळी मन शांत ठेवणे गरजेचे आहे. अर्थात, माणसाने चिंता करण्यापेक्षा माणसाने चिंतन करायला हवे. चांगल्या विचारांचे वाचन करायला हवे. संतांचे विचार वाचायला हवेत आणि आपल्याला समजलेले विचार आपल्या कुटुंबातील नागरिकांना सांगायला हवेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील डॉक्टर, संशोधकांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा सुरू केली आहे. नागरिक म्हणून आपलीही महत्त्वाची जबाबदारी आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच नामस्मरण करायला हवे. आपल्या माणसांना वेळ द्यावा, त्यांच्याबरोबरच वेळ घालवावा. आपल्याला जे खेळ आवडतात, कला आवडतात, त्या चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा. ज्यांना पुस्तक वाचायला आवडते, त्यांनी सकारात्मक ऊर्जा देणारी पुस्तके, चरित्रे, संतसाहित्य वाचावे. तसेच अध्यात्मिक विचार ऐकावेत, सकारात्मक विचारांचे आचरण करावे. महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्र किंवा राज्य सरकारने लॉकडाउनविषयी ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचे तंतोतत पालन करायला हवे.
संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे, ‘‘धावलो मी आता आपुल्या शोधावे, कृपा करोनी देवे आश्वासीजे, कोण आम्हांस ते क्षिणले भागले, तुजविन उगले पांडुरंगा घेता नाम, कोणापासी आम्ही सांगावे सुख-दु:ख, कोण तहान भूक निवारी, कोण या तपाची करी परिहार...’’ शेवटी करुणा भाकणे एवढेच आपल्या हाती आहे. मन प्रसन्न ठेऊनच आपण कोणत्याही विकारावर मात करू शकतो.हभप बाबामहाराज सातारकर(शब्दांकन : विश्वास मोरे )