- सदगुरू श्री वामनराव पैआज बरेच लोक मेडिटेशन करतात. मेडीटेशन करणे वाईट आहे असे मला म्हणायचे नाही. पण तुम्ही जर म्हणाल मेडिटेशनचा क्लास लाऊन मला मनशांती मिळेल तर त्यामुळे ती मिळणार नाही. आधी तुमची मनशांती का ढळली आणि तुम्हांला आता मनशांतीच्या क्लासला का जावे लागत आहे याचा विचार करा. मनशांती ढळण्याचे एकच कारण तुम्ही चांगले बोलत नाही व चांगल्या इच्छा करत नाही. जीवनविद्या सांगते तुला मनशांती पाहिजे तर मी सांगतो ते कर. हे केल्याने नुसती तुलाच मनशांती मिळेल असे नाही तर तू इतरांना देखील मनशांती देऊ शकशील. त्यामुळे तुला तर मनशांती मिळेलच पण तुझ्यामुळे इतर लोकांना देखील मनशांती मिळेल. त्याचबरोबर तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तू इतर लोकांना आनंदी करशील. अत्तरवाला असतो ना तो अत्तराच्या बाटल्या सोबत घेवून फिरतो त्यामुळे तो जिथे जाईल तिथे सुगंध दरवळतो. तसा आनंदी मनुष्य जिथे जाईल तिथे आनंद देतो. मग तुम्हाला पण अशी मनशांती हवी असेल तर आधी शुभ बोला, शुभ इच्छा करा, शुभ चिंतन करा आणि यथाशक्ती शुभ करा मग तुम्हांला मनशांती मिळते की नाही ते बघा. आता हे कुणी करायचे तर यावर लोक मला सांगतात वामनराव की तुम्हीच आमच्यावर कॄपा करा. मी सांगतो कर आणि पहा या नांव कृपा. म्हणून मी आता सांगितले तसे करा आणि मनशांती मिळते का ते पहा. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सुध्दा सांगतात, “डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी, तुका म्हणे घे रे जीवा नको सोडू या केशवा”.
यावरुन मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे मी हा विषय मांडत असताना अखिल मानव जात डोळयासमोर ठेवून हे सांगत आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने मी मानवजातीचा प्रतिनिधी आहे हे लक्षांत घेऊन ते वाचावे म्हणजे मी काय सांगतो ते तुम्हांला लगेच कळेल. माझे प्रबोधन हे अखिल मानवजातीला उद्देशून असते.हे सांगण्याचे कारण हेच की सुखी होणे किंवा दु:खी होणे हे आपल्या एकटयावर अवलंबून नसते हा एक महत्वाचा भाग आहे. मनुष्य हा समाजात रहाणारा प्राणी आहे म्हणून तो समाजाचा एक घटक आहे. मनुष्य हा समाजाचा घटक असल्यामुळे समाजात जे काही घडते त्याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्याच्यावर होत असतात व व्यक्तिकडून होणा-या कर्माचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम कुटुंबावर, समाजावर, राष्ट्रावर आणि विश्वावर होत असतात ही गोष्ट लक्षांत ठेवली तर आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा मी फक्त माझ्यापुरता विचार करतो असे बोलणे कसे अयोग्य आहे ते तुमच्या लक्षात येईल.