आपल्या मातृवत्सल हृदयाने साऱ्या विश्वाच्या डोक्यावर प्रेमाचा पदर पांघरणारी संत ज्ञानेश्वर माउली जेव्हा वैश्विक दु:खावर सांत्वनाची फुंकर घालण्यासाठी ‘जो जे वांछील तो ते लाहों प्राणीजात’ अशी विश्वप्रार्थना विश्वात्मक परमेश्वराकडे करतात तेव्हा माउली शास्त्र, वेद, उपनिषदे यांच्याही पुढे चार पावले गेले आहेत असे वाटते. सर्वेऽपि सुखिन: संतु। सर्वे संतु निरामय! ही प्रार्थना आपण सगळेच करीत आलो आहोत, पण भल्या, बुऱ्यांच्या सगळ्याच मानवजातीच्या इच्छा पूर्ण होवोत अशी शुभंकर इच्छा व्यक्त करण्यासाठी स्वत:च्या इच्छा- अपेक्षांचा ‘वै’ व्हावा लागतो तेव्हाच दुसºयाच्या इच्छा पूर्ण होवोत, असे मागणे मागता येते. स्वत:चे श्वास जेव्हा सुकुमार होतात आणि मुख सुखात्म्याचे माहेर होते तेव्हा दुसºयाच्या कल्याणाची भावना मनात निर्माण होते. माउलीच्या या उदात्त भावात्मकतेवर कळस चढविताना तुकोबाराय म्हणाले होते...जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जों आपुले।तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा।मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त।ज्यासी अपंगीता नाही, त्यासी धरी जों ऽहृदयी।दया करणे जें पुत्रासी, तेचि दासा अन् दासी।तुका म्हणे सांगो किती, त्याचि भगवंताची मूर्ती।दुसºयाच्या कल्याणासाठी जो भूतलावर जन्माला येतो त्याच्या मनातील आशा-निराशेची अवस्था भर्जीत बियाप्रमाणे झालेली असते. दुसºयाच्या सुखाने सुखी व्हावे आणि सर्वांना सुख देऊन झाल्यानंतरही जर भगवंत म्हणालाच, ‘अरे वत्सा! माग ना माझ्याकडे काहीतरी।’ तर त्याला भक्ताने उत्तर द्यावे, ‘सारी सुखे माझ्या पायाशी लोळण घेत आहेत, त्यामुळेच तर मी निर्भय आनंदात डोलत आहे.’ जर काही द्यायचे असेल तर ज्यांना गरज आहे त्यांना दे। एवढी मोठी सद्भावना प्रकट करण्यासाठी विधात्यानेच दुसºयाच्या कल्याणार्थ जन्माला आलेल्या सद्भक्ताची मूस तयार करावी लागते. खरे तर तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांना संसार सागराच्या पैलतीरापर्यंत नेऊन पोहोचविण्यासाठीच संताचे येणे होते. जे काही करावे, जे काही मागावे ते इतरांसाठीच असे त्यांचे जीवन जगण्याचे एकच तत्त्व असते. प्रामाणिकपणाने आणि ध्यासाने ते तत्त्व पाळत असतात. दिव्याने जसे दुसºयासाठी जळत राहावे आणि दुसºयाला प्रकाश द्यावा. मोबदल्यात मात्र स्वत:साठी काहीच मागू नये, तसे असते संताचे त्यागशील ‘जिणे’. ज्ञानी भक्ताने संतांचे हे जिणे समजून घ्यायचे आणि स्वत:ही तसे गुण आत्मसात करायचा प्रयत्न करायचे. असे झाले तर सारे काही सार्थकी लागेल. त्यासाठी संतांचे जीवन समजून घ्यावे. जर जो-जो जशी-जशी शुभंकर इच्छा व्यक्त करीत ती-ती त्याच्या कर्म अधिष्ठानाने पूर्ण झाली तर हा लहान-तो मोठा, हा गरीब-तो श्रीमंत, हा शोषक-तो शोषित हे भेदभावच राहणार नाहीत आणि हे समतेचे स्वप्न जेव्हा या संसारात प्रत्यक्षात येईल तेव्हाच आपल्या सुखी माणसांनी निर्माण केलेले वाळवंट नष्ट होऊन सर्व सुखी समाजाची संकल्पना साकार होईल. मात्र, तोपर्यंत ज्ञानोबा माउली म्हणतच राहतील।किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होवोनि तिन्ही लोकी।भजीजों आदि पुरुखी। अखंडित।- प्रा. शिवाजीराव भुकेले
जो जे वांछील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:40 AM