वामनराव देशपांडे ‘विश्वरूपदर्शन’ अध्यायात भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला ब्रह्मांडव्यापी स्वरूपाचे दर्शन घडवून चराचरात परमेश्वरी अस्तित्व नांदत आहे, हे पाहण्याची दिव्यदृष्टी दिली. याचा सोपा अर्थ असा की, या भाग्यशाली मानवी योनीलाच भगवंत अस्तित्वाचे अखंड चिंतन करता येते आणि ती जी भगवंतकृपेने दिव्यदृष्टी लाभली आहे त्याच्या साहाय्याने भगवंत अस्तित्वाला प्रत्यक्ष पाहता येते. हे भाग्य इतर योनींना नाही. म्हणून माणसाने चिंतनशील मनाच्या साहाय्याने भगवंतांचे नित्य स्मरण करीत, फक्त भगवंतांचाच ध्यास घेत, प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने, भगवंतांचे चतुर्भुज रूप आणि दिव्य परमेश्वरी स्वरूप अनुभवण्याचा ध्यास घ्यावा हा दिव्य संदेश, भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला गीतेमधल्या दहाव्या आणि अकराव्या अध्यायातून दिला आहे. भगवंतांनी अर्जुनाला आपले विराट स्वरूप दाखवले तेव्हा खरे तर अर्जुन भांबावून गेला होता. भगवंतांचे हे विराट स्वरूप पाहिल्यावर भेदरलेल्या अर्जुनाने आपले दोन्ही हात जोडून भगवंतांना प्रार्थना केली होती की,अह्ष्टपूर्व हषितोजस्मि ज़ष्टवा भयेन प्रव्यथिते मनो मे।तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास ।।
भगवंता, जे तुझे ब्रह्मांडस्वरूप पूर्वी मी कधीही पाहिले नव्हते, ते अवघ्या त्रैलोक्याला व्यापून पुन्हा दशांगुळे उरणारे भव्य स्वरूप पाहून मला निश्चितच हर्ष होतो आहे, परंतु तरीही मी भीतीने माझे अवघे हे मर्त्य अस्तित्व गारठून गेले आहे. माझे मन तुझे अक्राळविक्राळ भव्य रूप पाहताना व्यथित झाले आहे. मला आजपर्यंत जे तुझे शांत विष्णुरूपच पाहण्याची सवय झाली आहे ना, तेच पूर्वीचे तुमचे शांत देवरूप पुन्हा प्रकट करावे, अशी मी तुम्हाला विनंती करतो. भगवंता आपण मजवर प्रसन्न होऊन माझ्या रथावर जसे माझे रक्षण करण्यासाठी बसला होतात तसे मला माझे रक्षणकर्ते भगवंत म्हणून हवे आहात.