माता अमृतानंदमयीएके दिवशी, एक माणूस आपल्या नातवाला प्राणिसंग्रहालयात घेऊन गेला. तिथे शेजार-शेजारच्या दोन पिंजऱ्यांत दोन सिंह होते. एक सिंह त्याच्या पिंजºयाजवळ कोणीही गेलं, तरी शांतपणे बसून होता. कुणी त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, तरी तो रागावत नव्हता. याचा अर्थ तो सिंह माणसाच्या अस्तित्वाला सरावला होता. दुसरा सिंह त्याच्या जवळ येण्याचा जरासा प्रयत्न जरी केला, तरी गर्जना करत होता. तो आपल्या पंज्यांनी मारायचा प्रयत्न करत होता. यामुळे लोक त्याच्यापासून लांब राहात होते. त्या माणसानं विचारलं, ‘मुला, जर या दोन्ही सिंहांनी एकमेकांशी लढाई केली, तर कोण जिंकेल?’ कितीही विचार केला, तरी नातवाला त्याचं उत्तर सापडेना. तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘ज्या सिंहाला जास्त खायला घालण्यात आलं आहे, तो जिंकेल.’ आपल्या मनाचंही तसंच आहे. आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, तर ते मजबूत होतील. नकारात्मक गुण उदा. अहंकार आणि राग मनात घर करतील. ते अपयशाला आमंत्रण देतील. नकारात्मक विचारांमध्ये गुंतणं हे हिंसा, अन्याय आणि आज आपल्याभोवती दिसत असलेल्या इतर समस्यांचं प्रमुख कारण आहे. जर आपण सकारात्मक विचारांना प्रोत्साहन दिलं, तर ते मनाच्या मुळांपर्यंतच जातील आणि प्रेम, कनवाळूपणा आणि सहनशीलता हे गुण आपल्यात येतील. समाजात शांतता आणि तृप्तीला बहर येईल. हे होण्यापूर्वी आपण अहंकार, निस्वार्थीपणा आणि आवडी- निवडीचे तण आपल्या मनाच्या बागेतून काढून टाकावे लागतील. आपण प्रत्येक विचाराचे मनापासून विश्लेषण करायला हवे आणि नकारात्मक विचार काढून टाकत त्या जागी सकारात्मक विचार पेरले पाहिजेत. कुणी रागावलं, तर आपण किती दु:खी होतो याचा विचार करा. तसंच आपणही इतर कुणाच्या दु:खाचं कारण होता कामा नये. कुणी आपल्यावर प्रेम केलं, तर आपण आनंदी होतो, त्याचप्रमाणे आपण इतरांनाही आनंद द्यायला हवा.
आनंद तरंग: आनंदाचे देणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 2:33 AM