इंद्रजीत देशमुख
तुकोबाराय आम्हाला उच्च दर्जाची पारमार्थिक अनुभूती घेण्यासाठी भावयुक्त अंत:करणाने त्याची आराधना करायला सांगतात. वास्तविक संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी योग्य रीतीने साधण्यासाठी भाव असावाच लागतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट भावाच्या आधारावरच साधावी लागते. हाच भाव आपल्या दिवसभराच्या प्रत्येक व्यवहारात रूप बदलून आपल्याला वर्तवत असतो. त्यामुळेच आपला एखाद्याशी खूप जिवलग स्नेह तर एखाद्याशी अतिआकसी भांडण असे वर्तन आपल्या हातून होत असते. पारमार्थिकाबाबत ज्याच्या अंत:करणात सात्त्विक भावाचं भरतं आलेलं असतं तो या जगातील प्रत्येक जीवाला, ‘अवघे जन मज झाले लोकपाळ। सोयरे सकळ प्राणसखे’ या न्यायाने आपलंसं मानत असतो आणि त्यांच्याप्रति आपलं वर्तन ठेवत असतो. ज्यांची जीवनचर्या या भूमिकेने बहरलेली असते त्यांच्या जीवनात,
‘भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठाउठी।।’ अशी अनुभूती घेता येत असते. म्हणूनच प्रभुचिंतन करत असताना ‘आमच्या अंतरी कंठी प्रेम दाटे नयनी निर लोटे। हृदयी प्रगटे रामरूप।।' अशी सार्द्रता निर्माण व्हायला हवी. अशी भाविकता आम्ही जोपासली की आमच्या अंतरी कोणतंच वैषम्यमंडित मळभ उरत नाही आणि मग आम्ही आमचं आणि इतरांचं असं अवघ्यांचं आयुष्य आनंदी करू शकतो. भाविकतेत आपल्या मनात कमी-जास्तपणाचा भेद उरत नाही म्हणूनच सुदामा नावाचा गरीब मित्र आपल्या फाटक्या कणवटीत बांधून आणलेले मूठभर पोहे द्वारकाधीश श्रीकृष्णाला देतो तेव्हा राज्यपदी विराजमान असलेला हा परमात्मा ते पोहे मिटक्या मारत मारत आवडीने खातो. हा सगळा भावाचा परिणाम आणि प्रभाव आहे. जीवनातील प्रत्येक कृती जर भाव भरून केली तर ती प्रत्येक कृती आपल्या आराध्याला आवडणारी पूजाच असेल. अगदी माउलींच्याच भाषेत सांगायचं तर ‘मग तीही जे जे करावे। ते मजची पडले आघवे।।’