नीता ब्रह्मकुमारी‘भले बुरे ते घडून गेले...’ सुख-दु:ख, यश-अपयश, लाभ-हानी अनेक घटनांनी आपले जीवन भरलेले आहे. कधी कधी परिस्थितीला तोंड देत असताना किती तरी वेळा आपल्या मनात हा विचार येतो की माझ्याबरोबरच असे का झाले? माझ्याच जीवनात असे लोक का आले? इतके श्रम करूनही नेहमी मलाच का अपयश मिळते? प्रश्नांचे जाळे विणून स्वत: गुंतत जातो. जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, उत्तर मिळत नाही तोपर्यंत मनात विचारांचे वारे वाहतच राहतात. जीवनाचा हा प्रवास खूप दूरवर चालत राहणारा आहे. हा फक्त जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास नाही, परंतु जन्मोजन्मीचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये अनेक व्यक्तींशी सुख-दु:खांचे ऋणानुबंध जोडले गेले. हे धागे वेगवेगळ्या नात्यांनी गुंफले गेले. परंतु प्रवासात भेटलेली व्यक्ती, वस्तू, साधने आणिक आहेत, कालांतराने सर्वांनाच आपल्या मार्गाने पुढे जायचे असते. चांगल्या-वाईट कर्मांच्या गाठोड्याव्यतिरिक्त आपल्याजवळ काहीच उरत नाही.
‘कर्म’ हा शब्द खूप छोटा आहे. परंतु त्यामध्ये जीवनाची अनेक सत्ये दडलेली आहेत. या पृथ्वीवर आपण मनुष्यांची रूपे, त्यांची विचारसरणी, कार्यपद्धती यांची विविधता बघतो. थोडंसं थांबून स्वत:च्याच जीवनाला न्याहाळले तरीही आढळून येईल की प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काही वेगळा अनुभव देऊन जातो. आणि प्रत्येक वेळी कर्मांचे धागे अनेक अनेक व्यक्तींबरोबर आपण बांधत राहतो. सुख-दु:खाचे धागे असे विणले गेले आहेत की ज्यातून सुटका होणे कठीण. ‘जे पेराल ते उगवेल’ हा सिद्धांत आपल्याला माहीत आहे. म्हणून जेव्हा खूप दु:खी होतो तेव्हा अनायासेच आपल्या मुखावर शब्द येतात की ‘माहीत नाही हे कोणत्या जन्माचे, कोणत्या पापकर्मांचे फळ आहे? आपण हेसुद्धा समजतो कीजे आज आपल्याला लाभले आहे ते पूर्वजन्माचे संचित कर्मफळ आहे.