प्रल्हाद वामनराव पै
आई-वडिलांप्रमाणेच तुमच्यावर ज्ञान आणि प्रेमाचा वर्षाव करणारे तुमचे सर्व शिक्षकही तुमचे देवच आहेत. शिक्षक तुम्हाला जगाविषयी नवनव्या गोष्टींचं ज्ञान देतात. शैक्षणिक गोष्टींसोबत जीवनातील खडतर प्रवास कसा पार करायचा, आयुष्यात कसं यशस्वी व्हायचं हेही शिकवतात. ज्यामुळे मोठं झाल्यावर तुम्हाला समाजात एक महत्त्वाचं स्थान प्राप्त होतं. मात्र आजकाल काही मुलं जेव्हा याच शिक्षकांचा अनादर करताना मी पाहतो तेव्हा खूप वाईट वाटतं. कदाचित या मुलांना आता या गोष्टीचं महत्त्व पटलं नाही म्हणून ही मुलं अशी वागतात. पण पुढे भविष्यात मोठं झाल्यावर त्यांना याचं महत्त्व नक्कीच पटेल. मात्र तेव्हा थँक्स म्हणण्यासाठी तुमचे लाडके शिक्षक तुमच्यासोबत असतीलच असं नाही. यासाठी आतापासूनच प्रत्येक
गोष्टीसाठी तुमच्या शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. घरी जर तुम्ही तुमच्या एक-दोन मित्रांसोबत अथवा भावंडांसोबत दंगामस्ती केली तर काय होतं? आई-बाबा चांगलाच दम देतात, नाहीतर एखादा धपाटाही पाठीत बसतो. मग तुम्ही एका वर्गात किती जण असता? पन्नास, साठ कधी कधी त्याहून जास्त. मग इतक्या मुलांनी एकदम गोंधळ, मस्ती केल्यावर त्यांना शांत करण्यासाठी शिक्षक तुमच्यावर रागवले तर तुम्हाला राग का येतो? शिक्षक रागावतात कारण त्यात तुमचंच भलं असतं. तुम्ही चांगलं वागावं, तुम्ही यशस्वी व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा असते. शिक्षक रागावल्यामुळे तुम्हाला प्रचंड राग येतो. मग तुम्ही त्यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवता. त्यांचा रंग, शरीराची ठेवण, बोलण्याची शैली यावरून तुम्ही त्यांच्यामागून चिडवता, बोलताना एकेरी नावाचा उल्लेख करता. मात्र त्यांची तळमळ आणि प्रेम तुम्हाला दिसत नाही. त्यांनी दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठीच आपल्या शिक्षकांचा आदर करा. त्यांची कृतज्ञता व्यक्तकरा. तुम्हाला एखादं बक्षीस मिळतं तेव्हा आईवडिलांप्रमाणे शिक्षकांनाही तुमचा अभिमान वाटतो.