फा. फ्रान्सिस दिब्रिटोमाणसाला घर चालवायला नोकरीधंदा करावा लागतो. माणसं आपल्या परीनं अर्थार्जन करीत असतात, कुटुंबाचा भार उचलत असतात. वर्षानुवर्षे असंच चाललेलं असतं. वय पुढे सरकतं. पन्नाशी उलटते. शरीर थकू लागते. कुठेतरी थांबावसं वाटतं. निवृत्ती खुणावू लागते. मग एकदाचा तो दिवस उगवतो. पस्तीस, चाळीस वर्षे घाण्याच्या बैलाप्रमाणे चक्राकार चालणारा माणूस मोकळा श्वास घेतो. जणू पिंजऱ्यातला पक्षी उंच भरारी घेतो. मग नकळत ते मूक आकाश एका विस्तीर्ण पोकळीसारखे भासू लागते. वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न माणसाला पडतो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. काही नामांकित कंपन्या, कार्यालये आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाचा विचार करतात. त्यासाठी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी शिबिराची योजना केलेली असते. निवृत्तीनंतरच्या शारीरिक, मानसिक समस्यांचा विचार प्रभावीपणे मांडणारे तज्ज्ञ बोलावले जातात. निवृत्तीनंतर अनेक आजारपणं वस्तीला येऊ शकतात. त्यासाठी व्यायामाचे विविध पर्याय पुढे ठेवले जातात. योगागुरूंचे मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे, निवृत्तीनंतरच्या रिकाम्या मनाचाही विचार केला जातो. मनाच्या नियमनाचे धडे देणारे मनोवैज्ञानिक मार्गदर्शन करतात. ध्यानधारणा, प्राणायामाचे धडे देतात. मनाला आवरण्याची तंत्रे शिबिरार्थींना शिकविली जातात. निवृत्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक कसं बनवायचं, याचं मार्गदर्शन केलं जातं. एकूणच माणसांना निवृत्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी जणू तयार केलं जातं. माणसाचं लक्ष वर्षानुवर्षे नोकरीत केंद्रित झालेलं असतं. या गुंतलेपणापासून त्याला जीवनाच्या जिवंत प्रवाहात आणण्याचं हे आवश्यक कार्य असतं. कधी ना कधी माणसाला आपलं आयुष्य आवरायला घ्यायला सुरुवात करावीच लागते. म्हणून निवृत्तीनंतरच्या एकेका दिवसाचा विचार सगळ्यांनीच करायला हवा. नोकरदार आणि स्वयंरोजगार करणाºयांनीही!
आनंद तरंग: आयुष्याची आवराआवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 4:40 AM