- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
बहुतांशी प्रत्येक मनुष्य कर्माचे कर्तृत्व हे स्वतःकडे घेत असतो त्यामुळे माणसाच्या ठिकाणी कर्म कर्तृत्वाचा अहंकार निर्माण होतो आणि हाच अहंकार भवबंधाला कारण ठरतो.श्रीसमर्थ रामदास स्वामी श्रीमद् दासबोधात म्हणतात -
कर्ता मी ऐसे म्हणसी । तेणें तू कष्टी होसी ॥राम कर्ता म्हणता पावसी । यश कीर्ती प्रताप ॥रघुनाथ स्मरोनि कार्य करावे । ते तात्कालचि सिद्धी पावे ॥ कर्ता राम हे असो द्यावे । अभ्यंतरी ॥
अहंकाराचा त्याग करुन, कर्म कर्तृत्वाचा त्याग करुन, निराभिमान वृत्तीने सर्व कर्मे जर ब्रह्मार्पण केली तरच विहित कर्माला भक्तीचा अधिकार प्राप्त होतो. वेगळी भक्ती करण्याची गरज रहात नाही. भक्तीयोगाच्या संदर्भात आणखी एक महत्वाचे चिंतन असे की, विहित कर्मे जर भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात केली तर, कर्मयोगाच्या वाटेने, भक्तीमंदिरात जाता येते. नदीवरुन पाणी आणतांना, माताभगिनी डोक्यावर हंडे ठेवतात, हात मोकळे सोडून घराकडे भराभर चालत येतात, रस्त्यात मैत्रिणींबरोबर गप्पागोष्टी करतात तरीही हंड्यातील पाणी सांडत नाही, घागर कलंडत नाही, कारण त्यांचे सगळे लक्ष फक्त डोक्यावरील हंड्याकडेच असते. अनुसंधानात लक्ष फक्त हंड्यातील पाण्याकडेच असते म्हणून पाणी सांडत नाही तसे साधकाने संसारातील कर्म करीत असताना अनुसंधान फक्त परमेश्वराकडेच ठेवले तर, विहित कर्मालाच भक्तीचा दर्जा प्राप्त होईल. आपले हातून घडणारे प्रत्येक कर्म रघुनाथ स्मरणपूर्वक करावे तरच ते सिद्धीला जाईल.
भक्तीयोगाचे स्वरुप विशद करताना श्रीसमर्थ म्हणतात, कर्म निष्काम करा. फलाची अपेक्षा न करता कर्म केले तर, अशी निष्काम भक्ती साधकाला अमरत्व प्रदान करते. निष्काम भक्ताच्या पायाजवळ अष्टमहासिद्धी लोळण घेतात. भगवंताला निष्काम भक्तच आवडतो. संत म्हणतात -
नाना फळें देवापाशी । आणि फळ अंतरी भगवंतासी ॥या कारणे भगवंतासी । निष्काम भजावे ॥
अशा निष्काम कर्मातूनच भक्ती घडते, उपासना घडते, उपासनेतून ज्ञान प्राप्ती होते आणि ज्ञानातून मोक्ष मिळतो. उपासना, भक्ती, ज्ञान आणि मोक्ष या मार्गाने साधकाचा प्रवास होतो..!
( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१३४४९६० )