मनामध्ये अनेक चांगले वाईट विचार असतात. परंतु मन सतत चिंतनात मग्न असावे. नकारात्मक प्रणाली मनात आणू नये. भगवान अथवा कोणी दिव्यपुरुष याचे चिंतन करणे महत्त्वाचे आहे. आपले मन-बुद्धी ही एकमात्र परमात्म्याच्या ठिकाणी लावा. मनाला प्रलोभन आणि विषयात भटकू देऊ नका. जी माणसे नेहमी सदा उच्चतर मन:स्थितीत जगतात. त्यांचे मन प्रलोभित नसते. नेहमी चांगले विचार आणि कल्पना याचे भंडार आपल्याजवळ ठेवा. समजा एखादी व्यक्ती तुमचे मन आकर्षित करुन घेते. तेवढ्यात तुमच्या मनात एखादी विचित्र कल्पना आली. त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात अनेक कल्पना निर्माण होतात. मनात उठणाऱ्या सर्व कल्पना नित्य प्रकाशित असतात.
आत्मज्योतित त्या मनात विलीन करण्यासाठी एक प्रभावशाली उपाय म्हणजे प्रलोभित मनाला अंधकारमय प्रदेशातून काढून टाकणे होय. तुमचे मन उर्ध्वगामी करा. त्याच्यासोबत मित्रत्वाचा व्यवहार करा. त्याच्या अंतरिक शत्रूला मारा. त्या मनाला स्त्री-पुरुष, देह आहे ही जाणीवच नसणे. फक्त स्वयं आत्मस्वरूप चैतन्य आणि आनंदीस्वत्व भौतिकस्थिती सुनियोजित असावी. मनातल्या अनेक समस्या चिंता निर्माण करतात. चिंतित मन नेहमी अशांती निर्माण करते. अनिर्णय स्थिती निर्माण करुन कठीण प्रसंग उभे करते. अचानक मनात उठणाऱ्या लहरींना शुभ-भाव नियमित करु शकत नाही. मनात वाईट विचार उठतात तेव्हा पराभूत झालेले मन दृष्टीस पडते. तेथे निष्क्रिय मनाची लक्षणे जाणवतात. ज्या मनात उपद्रव असतो. व्याभिचार असतो. ते मन कधी धर्म-अधर्माच्या कल्पना मांडत नाही. कर्मरेषा सांभाळत नाही. असे मन निष्क्रियतेत गुंतलेले असते. त्या मनाला सावरण्यासाठी भक्तिपूर्ण मनाची गरज असते. आंतर प्रक्रियेत बदल घडविण्यासाठी अनुष्ठान करणाऱ्या मनाची गरज भासते. म्हणून म्हणावेसे वाटते की आंतरमनाचा परिपाठ शुद्ध ठेवा. मन ताळ्यावर येईल.
- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष.)