- डॉ. दत्ता कोहिनकरमित्रांनो; अपराधीपणाची भावना मनात ठेवून जगू नका. समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली व शिट्टी दाबूनच ठेवली तर त्याचे काय होईल ? अर्थात स्फोटच. पाण्याला वाहण्याचा मार्ग बंद केला तर ते पाणी आतल्या आत रापून त्याला दुर्गंधी सुटेल . मानवी मनाचे असेच असते. भावनांना वाट मिळाली नाही, विचारांची देवाणघेवाण झाली नाही की मनात विकृती निर्माण होऊन डिप्रेशन येते . म्हणून संवाद हा अत्यंत आवश्यक असतो. तो मनाचा आहार आहे. संवादामुळे मन मोकळे व हलके होते . विचारांच्या देवाणघेवाणीमुळे विचारांना नवा आयाम मिळतो. आपलं मानसिक संतुलन चांगलं राहतं. थोडक्यात कुकरची शिट्टी दाबू नका. योग्य वेळी योग्य प्रकारे बिनधास्त व्यक्त व्हा . संपन्न व्यक्तिमत्वासाठी व निरोगी मनासाठी संवाद आवश्यक असतो .
तुम्ही मनातच गोष्टी दाबून ठेवल्या तर, शरीरावर व मनावर त्याचा दुष्परिणाम होतो.मनात दाबून ठेवलेली उर्जा बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. मग पाय हलविणे, मुठी आवळणे, आळोखे पिळोखे देणे अशा क्रिया आपोआप घडू लागतात. तुम्ही स्वत:चे निरीक्षण करा, तुम्ही खुर्चीवर बसला आहात, पाय आपोआप हलत आहेत, बेडवर पाय आपोआप आपटले जातात . एखाद्याचा खूप राग आला पण तुम्ही तो व्यक्त करू शकला नाहीत. त्या नकारात्मक उर्जेला तुम्ही योग्य रितीने वाट करून दिली नाही तर हळूहळू ती उर्जा शरीरावर व मनावर नकारात्मक परिणाम करते. त्यातून मानसिक व शारीरिक व्याधींना सुरवात होते. आपल्याला कधी कधी भांडावेसे वाटते, मारामारी करावीशी वाटते, शिवीगाळ कराविशी वाटते,यांचे कारण काय? तर आत कोंडलेली उर्जा बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. कधी ओरडावेसे वाटले, मारावेसे वाटले तर उशीवर गुद्दे मारा, नाचावेसे वाटले तर नाचा, रडावेसे वाटले तर रडा, हसावेसे वाटले तर बिनधास्त हसा. मित्रांनो जीवन सुंदर आहे. मनांसारखे आनंदाने, नैतिकतेने प्रेमाने जगा. भावनांचे दमन न करता योग्य नैसर्गिक मार्गाने शमन करा. मोकळे होण्यासाठी तुम्ही स्वमनाला एवढंच सांगा