नवरात्रीच्या सणाच्या शेवटी येणारा दसरा हा नेहमीच नवीन वर्षासाठी प्रेरणा देणारा ठरतो. या दिवशी सोनं, चांदी, गाडी अशा नवीन वस्तू किंवा इतर संपत्ती शुभमुहूर्तावर घेतल्या जातात. विजयादशमी निमित्त सोनं खरेदीसाठी लोकं मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. आश्विन शुद्ध दशमी तिथी आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून 'विजयादशमी' या नावाने ओळखला जातो. रावण दहनासह सरस्वती पूजन, शस्त्र पूजनही केले जाते. तसंच या दिवशी आपट्यांच्या पानांना विशेष महत्त्व असते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आजचा संपूर्ण दिवस पूजनासाठी शुभ मानला जातो.
यंदाच्यावर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे फासरा उत्साह कुठेही दिसून येत नाहीये. मात्र लोक घरच्याघरी आपला आनंद साजरा करण्यासाठी गोड धोड जेवण बनवण्यापासून ते शस्त्रपूजन, सरस्वती पूजा हे सारं काही करतील. आज आम्ही तुम्हाला शस्त्र पूजन आणि सरस्वती पूजन कसं करायचं याबद्दल सांगणार आहोत.
दसऱ्यासाठी पुजेचा शुभ मुहूर्त
विजयादशमीच्या पुजेचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी सुरू होत दुपारी ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे. तुम्हाला पुजेसाठी २ तास १५ मिनिटांची वेळ आहे. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५७ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत आहे. हा एकूण वेळ ४५ मिनिटांचा आहे.
सरस्वती पूजन:
वहीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चिन्ह काढून घ्या. एका पाटावर कोणतेही कोरे वस्त्र अंथरुन त्यावर साकारलेले सरस्वतीचे चिन्ह ठेवा. त्यासोबतच अभ्यासाची पुस्तकही ठेवा. सध्याच्या काळात लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या माध्यमातून काम होत असल्याने त्याचीही पूजा केली जाते. त्यावर हळद-कुंकू अक्षता, फुलं वाहा. दिवा-अगरबत्ती ओवाळून नमस्कार करा. दसऱ्यादिवशी वाद्यांचीही पूजा केली जाते.
शस्त्र पूजन
सरस्वती पूजनासोबत शस्त्रपूजन करण्यासाठी त्याच पाटावर किंवा शेजारी घरातील शस्त्र म्हणजे सुरी, विळी, पक्कड इत्यादी मांडून त्यावरही हळद-कुंकू अक्षता वाहा. फुलं वाहा. दिवा-अगरबत्ती ओवाळा. यासोबत एखादा गोड पदार्थ किंवा साखरेचा नैवैद्यही दाखवला जातो. तसंच शेजारी आपट्याच्या पानांची जुडी ठेवून त्याचीही पूजा केली जाते. आजूबाजूला रांगोळीही काढली जाते. Dussehra 2020 Wishes : दसऱ्या निमित्त नातेवाईक आणि परिजनांना खास शुभेच्छा देऊन उत्सव करा साजरा