भज् गोविंदम - ६
जटिलो मुण्डी लुंचितकेश: काषायाम्बरबहुक्रुत वेष : ॥ पश्यन्नपि च न पशति मूढ उदरनिमित्तं बहुक्रुतवेष : ॥ भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते...॥ध्रु॥ दांभिकता ही फार पुरातन कालापासून चालत आलेली आहे. सत्य-असत्य हा सापेक्ष धर्म आहेच. धर्माचा खरा अर्थ न समजता आपल्या पोटासाठी धर्माचे सोंग घेतलेली माणसे आजही कमी नाहीत. अंधश्रध्देचे बळी याच लोकांमुळे होत असतात. परमार्थाचा खरा अर्थ कळलेला नसतो आणि सोंग मात्र करतात. ‘पानी पिना छानके और गुरु करना जानके’ बाजारात गेल्यानंतर माणूस मडके घ्यायचे असेल तर ते वाजवून घेतो. मग गुरु करायचा तर तो आंधळेपणाने कसा करावा ? जगात भोंदू लोकांचा भरणा तर भरपूर आहे. जगदगुरु श्री. संत तुकाराम महारांजाच्या काळातही असे भोंदू लोक होतेच. महाराजांनी अशा लोकांचा बुरखा फाडला आहे. ते त्यांच्याच शब्दात पाहू.
लांबवुनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोठा करिताती ॥१॥सर्वांगा करिती विभुती लेपन । पहाताती मिष्टान्न भक्षावया ॥२॥
किंवा.
दाढि डोई मूंडी मुंडूनियां सर्व । पांघुरती बरवी वस्रे काळे ॥१॥उफराटी काठी घेउनियां हाती । उपदेश देती सर्वत्रासी ॥२॥
किंवा
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ॥१॥अंगा लावुनिया राख । डोळे झांकुनि करती पाप ॥२॥
किंवा
ऐसे संत झाले कळी । तोंडी तंमाखुची नळी ॥१॥स्नान संध्या बुडविली । पुढे भांग वोढवली ॥२॥भांग भुर्का हे साधन । पची पडे मद्यपान ॥३॥तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडुरंग ॥४ ॥ वरील अभंगाचा विचार केला तर लक्षात येते की, लोक डोक्याचे केस वाढवतात. दाढी वाढवतात. भगवे कपडे घालतात. मिथ्याचार करीत लोकांना फसवतात. असे हे साधू कुकर्म करुन, विषय भोग भोगून, अंगाला राख लावून पाप करतात. आचार्यांनी नेमके वर्मावर बोट ठेवले दांभिकतेवर. त्यांनी सुंदर विचार मांडले. जसे गुण कळावे तसे अवगुणसुध्दा कळावे लागतात. कारण दोष जर कळले नाही तर ते (दोष) टाकता येत नाहीत. आचार्यांनी समाजाला भोंदू, दांभीक साधू कळावे म्हणून त्यांनी ‘जटिलो मुण्डी लुंचितकेश: काषायाम्बरबहुक्रुत वेष : ॥ पश्यन्नपि च न पशति मूढ उदरनिमित्तं बहुक्रुतवेष : ॥ह्या श्लोकाद्वारे स्पष्ट केले आहे.
बुडते हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया ॥ ह्या तुकोक्तिप्रमाणे समाजाची आचार्यांना दया आली आणि त्यांनी पोटासाठी ‘बहुक्रुत वेष’ नाना वेष करुन समाजाची दिशाभूल करतात. यामुळे समाज अधोगतीस जातो. समाज आचार-भ्रष्ट, विचार-भ्रष्ट, धर्म-भ्रष्ट, होताना संतांनी पाहिला आणि त्यांना ते बघवले गेले नाही. म्हणून त्यांनी समाज प्रबोधन केले. ‘उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ॥ खºया-खोट्याचा निवाडा करण्यासाठी आम्ही आलो आहोत.
माउली ज्ञानोबाराय म्हणतात, तापत्रये तापली गुरुते गिवसीती । भगवा देखोनी म्हणती तारा स्वामी ॥ लोक त्रिवीध तापाने पोळलेले असतात. त्यांना कुठेतरी समाधान हवे असते. मग ते लोक भोंदू साधू, भगव्या वेषधारी साधुला खरा साधू समजतात व त्याला शरण जातात. तो त्यांना फसवतात. म्हणून संत समाजाला विचार देऊन जागे करण्याचा प्रयत्न करतात. प्रबोधन करुन समाज जागृती करुन फार महत्वाचे काम संतानी केले आहे. सदाचार संपन्न समाज घडवण्यात संताचे फार मोठे योगदान आहे. त्यांचे समाजावर फार मोठे उपकार आहेत.
जगदगुरु श्री. तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगो आता संताचे उपकार । मज निरंतर जागविती. धर्म जागृती, कर्म जागृती, उपासना जागृती, नाम जागृती, तीर्थ जागृती, अशा अनेक प्रकारच्या जागृती आहेत. तथापि सर्वात महत्वाची म्हणजे आत्म जागृती. ही जागृती संत करीत असतात. त्यामुळेच या जगाला खरे मार्गदर्शन होत असते.
-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले,( गुरुकुल भागवाताश्रम, चिचोंडी (पाटील) ता. जि. अहमदनगर)