- कौमुदी गोडबोलेसकल सृष्टी पंचमहाभूतांनी युक्त आहे. या सृष्टीमध्ये असणाऱ्या योनी, जीव हेदेखील पंचमहाभूतांनी युक्त आहेत. त्यात मानव योनी सर्वश्रेष्ठ आहे. मानवाच्या देहात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचं विशिष्ट प्रमाण आहे. जो जीव जन्म घेतो त्याचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू हे सत्य आहे. या सत्याचा स्वीकार सहजपणानं केला की मृत्यूचं भय वाटत नाही. अवती भवती शेकडो बाळं जन्म घेतात. त्याचक्षणी शेकडो लोक मृत्यू पावतात. उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्था माणसालादेखील असतात. माणूस जन्म घेतो, वाढतो, शेवटी लयाच्या अवस्थेला पोहोचतो. म्हणजे मृत्यूच्या कराल दाढेखाली येतो. जन्म-मृत्यूचे फेरे सतत चालूच राहतात.मृत्यूचं भान ठेवलं की माणूस विनम्रपणानं वर्तन करतो. ज्याला हे भान नसतं तो गुणांचा आभास निर्माण करून गर्वानं फुगतो. स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजतो. इतरांना तुच्छ लेखू लागतो.देहाच्या नश्वरतेची जाणीव समर्थ रामदास स्वामींनी यथार्थ शब्दात करून दिली आहे. देह कायमस्वरूपी नाही. त्याचा नाश होणार, याचा स्वीकार केला की माणसाचे पाय जमिनीवर टेकतात. वास्तव येतं. मनुष्य देह पंचमहाभूतांचा बनलेला असल्यामुळे तो पंचमहाभूतांमध्येच मिसळून जाणार. मृत्यू श्रीमंत, गरीब, राजा- रंक, याचा मृत्यू विचार करती नाही. तो स्त्री-पुरुष, जात-पंथ हा भेदही करत नाही. सगळ्यांना समान न्याय लावणारा मृत्यू श्रेष्ठ आहे. मृत्यू कोणत्या वेळी येणार हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे कशाप्रकारे येणार याची कुणाला कल्पना करता येत नाही. कोणत्या स्थानी येईल हेही ज्ञात नसतं. गूढ, गहन, गंभीर असणारा मृत्यू! त्याचं कोडं उकलता उकलत नाही.प्रत्येकाला मृत्यूच्या स्वाधीन व्हायचं असतं. मग नाशिवंत देहाचा अहंकार, गर्व, ताठा कशासाठी? मृत्यू भगवंतानं स्वत:च्या हातात ठेवलेला आहे. त्यामुळे भगवंताला प्रार्थना करायची की, ‘‘षड्रिपू नाहीसे होऊ दे.’’ आनंद, स्वानंद, परमानंदाची प्राप्ती करण्याची सद्बुद्धी प्रदान कर. सर्वांप्रति प्रेमभाव, चित्तामध्ये राहू दे.’’ जन्म देणारा आणि मृत्यूचं दान देणारा भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या स्मरणात राहणाºयाला मृत्यूची वेगळी तयारी करावी लागत नाही. तो वासनांचं गाठोडं दूर भिरकावून नि:संग होऊन मृत्यूच्या स्वागतासाठी सज्ज असतो. समाधानाचा सुगंध लेवून जगणाºयाला मृत्यूच्या आगमनाचा आनंद वाटतो. मृत्यू समवेत प्रवास करणं ही त्याच्यासाठी एक ‘आनंदयात्रा’ होऊन जाते.
‘‘मृत्यूचं भान’’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 4:00 AM