लावूनी सरे अंगी देवचियानारदांपासून सर्व ऋषी मुनी आणि साधूसंतांनी भक्तिमार्गाची चर्चा केली आहे. कलियुगात भगवद्प्राप्तीसाठी यज्ञयागाद्वारे साधनांचं तुलनेत भक्तिमार्ग अधिक सुलभ आहे, किंबहुना तो सर्वात सोपा मार्ग आहे. ‘‘तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी’’ असे संतांचे वचन आहे. प्रपंचाच्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला संसारी जीव परमार्थाबाबत मात्र उदासीन तरी दिसतो किंवा अज्ञानी तरी असतो. विषयांच्या रानात भरकटलेल्या प्रापंचिकांना जप, तप, व्रत, याग इ.साधने कळणार ही नाहीत आणि त्यांच्याकडून घडणारी नाहीत. देहाला कष्ट मात्र होतील.संत तुकाराम महाराज सांगतात,‘‘नको सांडू अन्न नको सेवू वन। चिंती नारायण सर्व भोगी।।नको गुंफो भोगी, नको पहो त्यागी । लावूनी सरे अंगी देवचिया।।विषयांच्या भोगात गुंतू नये आणि त्यागाच्या भानगडीतही पडू नये. आपण हे सर्व काही देवावर सोपवून, त्याचाच प्रसाद मानून त्यालाच अर्पण करावेत. नित्य कर्म करत असतांना त्याचे चिंतन सोडू नये. कामामध्ये काम काही म्हणा राम राम... असे संतांचे सांगणे आहे. आपले काम सोडून तीर्थयात्रा करण्यापेक्षा, जप- तप अनुष्ठान करण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेले कर्म चांगल्या रितीने करून ते र्ईश्वरार्पण कर, हीच खरी पूजा आणि हीच खरी भक्ती.तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्म कुसुमांची वीरा।पूजा केली होय अपारा। तोषा लागी....असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणूनच कांदा -मुळ्यात अन् लसूण मिरची कोथिंबिरीतही संत सावता महाराजांना विठ्ठलाचे दर्शन होते. आपला मळा सोडून पंढरपूरला जायची त्यांना गरज वाटत नाही. देवच त्यांच्या मळ्यात, पाना- फुलात अवतीर्ण होतो. ‘तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी। देवा तुझं येनं जानं वारा सांगे कानामधी’ असे बहिणाबाई म्हणतात ते यामुळेच.संतांनी सांगितलेल्या या भक्तीच्या वाटेवर आपली पाऊले पडतील तो सोन्याचा दिवस म्हणावा लागेल.पु.ल.देशपांडे यांचे एक प्रसिद्ध वाक्य आठवले. ‘जगात गाढवांची कमी नाही, तस्मात् तुम्ही कुंभार बना’’. असे कुंभारही आता बरेच आढळून येतात. संत तुकाराम महाराजांनी अशा दांभिक धर्ममार्तंडावर कोरडे ओढले आहेत.‘कथा करोनिया दावी प्रेमकळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ।।टिळा टोपी माळा देवाचे गबाळे। वागवी ओंगळ पोटासाठी।गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी । तयाचे अंतरी काम लोभ ।।कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे । प्रेमाविण डोळे गळताती ।।तुका म्हणे ऐसे भावेचे मविंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ।।परमार्थाच्या नावाने संसारचा साधणाऱ्या या स्वार्थी संधी साधूंना तुकोबाराय उघडे पाडतात. त्यासाठी तीक्ष्ण शब्दांची शस्त्रे करतात. लहान-थोरांची भीड बाळगत नाहीत. अशा तथाकथित पोटार्थी साधूंमुळे समाजाचे आणि परमार्थाचेही फार नुकसान होत असते. म्हणून खरा धर्म सांगण्यासाठी आम्ही वैकुंठाहून आलो, शिकवल्याप्रमाणे पोपटही बोलत असतो. ‘शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाही कोणा।।’यांचा सर्व पसारा केवळ लौकिकासाठी असतो. ‘दंभ करी सोंग मानावया जग। मुखे बोले त्याग मनी नाही ।। अशा दांभिकांपासून दूर राहणेच हिताचे आहे.- प्रा.सी.एस.पाटील, धरणगाव.
लावूनी सरे अंगी देवचिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 9:08 PM