- धर्मराज हल्लाळे
मानवाला उपजत काही गुण मिळालेले आहेत. प्राणीमात्रांवर दया करा, हे प्रत्येक धर्माचरणात मूलभूत तत्व आहे. प्रेमभावनाही प्रत्येकाच्या ठायी आहे. वडिलधाऱ्यांचा आदर करावा, हेही आम्हाला शिकविले आहे. त्यातील दया, प्रेम आणि आदर ही मूल्ये परस्परपूरक असली तरी त्यात अंतर आहे. दया प्राण्यांबद्दल व्यक्त होते. अपरिचित व्यक्तिची वेदना पाहून त्यांच्याबद्दलही दयाबुद्घी जागृत होते. एखाद्याच्या वाट्याला आलेले दु:ख, हाल पाहून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होणे, अर्थात दयाबुद्घी असणे हे माणुसकीचे लक्षण आहे. रस्त्याने जात असताना अपघातात जखमी होवून विव्हळत असणाऱ्या माणसाला पाहून आपण थांबतो. त्याच्या वेदना वाटून घेवू शकत नाही. परंतु, त्याच्याप्रती सहानुभूती दर्शवू शकतो. त्याला मदत करु शकतो. हे दयेच्या भावनेने सहज घडते.
प्रेमभावना ही जितकी उत्कट, सहज सांगितली जाते, तितकी ती सहजपणे कोणाबाबतही प्रकट होत नाही. प्रेम सहवासाने निर्माण होते. वृद्घिंगत होते. रक्ताच्या नात्यांमध्ये जागृत होते. आपल्यापोटी जन्माला येणाऱ्या अपत्याविषयी निर्माण होणार प्रेमभाव हा नैसर्गिक आहे. ते अपत्य सद्वर्तनी निघो अथवा त्याच्या हातून चुका घडो, माता-पित्याला आपल्या अपत्याचे कौतुकच असते. पती-पत्नीच्या नात्यातील प्रेमभावनाही सुख-दु:खात, चांगल्या-वाईट प्रसंगात सदोदित राहते. एकंदर दयाबुद्घीत माणुसकी दडली असली तरी ते वर्तन तात्कालिक असते. ज्याच्याबद्दल दयाबुद्घी दाखविली, त्याच्याविषयी प्रेम असलेच पाहिजे अथवा पुढे प्रेम कायम राहिले पाहिजे, असे घडत नाही. अर्थात प्रेमभावना ही उंचीवर घेवून जाणारी आहे. त्यामध्ये त्याग, समर्पण, निष्ठा अभिप्रेत असते.
दया आणि प्रेम यापेक्षाही आदरभाव हा तुलनेने अधिक मौल्यवान ठरतो. एखाद्या माता-पित्याला आपल्या अपत्याविषयी प्रेम असणे स्वाभाविक, नैसर्गिक आहे. याचा अर्थ त्यांच्या मनात अपत्याविषयी आदरभाव असतोच असे नाही. अगदी तेच पती-पत्नी नात्यातही घडते. मद्याच्या प्रभावाखाली असलेल्या पतीला संकटातून बाहेर काढणारी पत्नी नक्कीच आपल्या पतीविषयी अजन्म प्रेमभावना ठेवते. परंतु, त्याच्या वारंवार होणाऱ्या चुकांमुळे तो पत्नीच्या मनात आदरभाव निर्माण करु शकत नाही. आदरभाव हा कार्यकर्तृत्वाशी निगडीत आहे. सामाजिक प्रतिष्ठेशी निगडीत आहे. जो गुणवान आहे त्याला समाजात प्रतिष्ठा आहे आणि त्याच व्यक्तिविषयी आदरभाव निर्माण होतो. एकाच कुटुंबातील सदस्य नक्कीच एकमेकांवर प्रेम करतात. त्यातील एखादी व्यक्ती अशी असते, ज्याचा सर्वांना आदर असतो. कारण ती व्यक्ती कर्तृत्वाने, सद्वर्तन, त्यागाद्वारे स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारे असते. त्यासाठी दयाबुद्घी, प्रेमभाव जागृत ठेवण्याबरोबरच आपले वर्तन इतरांच्या मनात आदरभाव प्रकट करणारे असले पाहिजे. ज्याच्याकडे आदराने पाहिजे जाते ती गुणवान व्यक्ती सर्वार्थाने धनवान आहे.