संजय शिंदे
सोलापूर : भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक सणाच्या मागे काही शास्त्रीय कारणेही आहेत. आज मकर संक्रांत... या सणामध्ये तीळ-गूळ, बाजरीची भाकरी, गरगट्टा, खिचडी, गूळ-शेंगा पोळी यांना खूप महत्त्व आहे.
संक्रांत हा सण हिवाळ्यात येत असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. तीळ-गूळ, बाजरीची भाकरी, गरगट्टा (मिश्रभाजी), खिचडी, गूळ-शेंगा पोळी यांच्या खाण्यामुळे थंडीपासून ऊर्जा मिळणे आणि पौष्टिकता ही जशी कारणे आहेत तशीच तिळाचे सेवन करण्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत.
तीळ आणि गूळ यांचे सेवन करण्यामागे शास्त्रीय कारण हे आहे की, याने शरीराला ऊर्जा मिळते. हिवाळ्यात शरीराच्या सुरक्षेसाठी याची फार गरज असते. या दिवसात शरीराचे तापमान आणि बाह्य तापमानामध्ये संतुलन राखायचे असते. तीळ आणि गूळ गरम पदार्थ असल्याने शरीराला उष्णता लाभते.
या मोसमात तीळगूळ खाल्ल्याने सर्दी- खोकल्यापासून आराम मिळतो. तिळामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, ट्रायओफॅन, आयर्न, मँगेनिझ, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन बी १ आणि फायबर्स भरपूर प्रमाणात आढळतात. एक चतुर्थांश कप तिळाच्या बियांनी २०६ कॅलरी ऊर्जा प्राप्त होते. गठिया आजाराने त्रस्त लोकांना तिळाने फायदा होतो. तिळात अँटीआॅक्सीडेंट गुण आढळतात. तीळ हे शरीरात आढळणारे जीवाणू आणि कीटक नष्ट करते. तसेच या सणादरम्यान खिचडी करण्यामागेदेखील एक शास्त्रीय कारण आहे, ते म्हणजे खिचडी पचनक्रिया सुरळीत ठेवते. यात आले, मटार मिसळल्याने ते रोग प्रतिकारकशक्ती वाढवते.
फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही बाजरीची भाकरी अत्यंत पौष्टिकअसते. त्यामुळे थंडीमध्येही भाकरी खाणे फायदेशीर ठरते. आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश केल्यामुळे हाडांशी निगडित आजार दूर होण्यास मदत होते. तसेच वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. बाजरीच्या भाकरीमध्ये असणारं नियासिन नावाचं व्हिटॅमिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य राखण्यास मदत होते. थंडीमध्ये बाजरीची भाकरी शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी मदत करते. बाजरीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. तसेच बाजरीची भाकरी खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे जास्त खाण्यापासून दूर राहिल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हृदयाच्या आजारांपासून बचाव करते बाजरीची भाकरी - बाजरीची भाकरी ही हृदयासंबंधित आजारांनी त्रस्त असणाºया लोकांसाठी फायदेशीर ठरते. बाजरीमधील पोषक तत्त्वे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो. बाजरीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे शरीरासाठी उपयोगी ठरते. हे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम करते. पचनक्रिया सुधारण्यासाठी बाजरीची भाकरी फायदेशीर ठरते. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत करते. डायबिटीस्च्या रुग्णांसाठी बाजरीची भाकरी मदत करते. डायबिटीस्पासून बचाव करण्यासाठी तसेच कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठीही मदत करते.
भारतीय ऋतुनुसार प्रत्येक सणाला त्याचे एक वेगळे महत्त्व आहे. बाजरी ही जशी ऊर्जा देते तशीच ती पित्तवर्धकही असून ती लोण्याबरोबर खाल्ल्याने शरीराला जास्त फायदेशीर ठरते.- डॉ. संजीव मुंडेवाडीसोलापूर