सोलापूर : दैनंदिन जीवनात जगात ज्याच्याकडे पुष्कळ असते, त्याला आणखी मिळते आणि ज्याला खरोखरच गरज असते त्याला काहीच मिळत नाही, परंतु अशावेळी ‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान’ ही जगद्गुुरू संत तुकाराम महाराजांची शिकवण महत्त्वाची ठरते, असेही आचार्य किशोरजी व्यास यांनी सांगितले.
मनुष्याकडे केवळ ज्ञान असून उपयोग नाही. त्या ज्ञानाचे रूपांतर त्यागात होणे अपेक्षित असते़ भगवान श्रीकृष्ण व मित्र सुदामा यांची मैत्री अतूट होती. यात सुदामाची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. त्या स्थितीतही तो समाधानी होता. तेच तत्त्व समाजात प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे.
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे प. पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज उपाख्य आचार्य किशोरजी व्यास यांच्या भागवत कथेचे आयोजन पर्ल गार्डन येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सोमवारी कथामालेत त्यांनी द्वारकालीला, सुदामापूजन, भागवत धर्म, उद्धवोपदेश सांगून कथासमाप्ती केली.
आचार्यांनी आपल्या उपदेशात भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या अतूट मैत्रीचा दाखला दिला. सुदामाची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. परंतु त्यांची वृत्ती समाधानी होती. महाभारतात असलेली सुदामाची ही वृत्ती केवळ एक प्रसंग नसून प्रतिकूल परिस्थितीतही मनुष्याने समाधानी राहावे, ही समस्त मनुष्यमात्राला दिलेली फार मोठी शिकवण असल्याचे स्पष्ट केले. या भागवत कथेत आचार्य किशोरजी व्यास यांनी दररोज श्री भागवत महात्म्य, श्री नारद - व्यास संवाद, सतीचरित्र, ध्रुवाख्यान, भरतचरित्र, नृसिंह अवतार, श्रीकृष्ण बाललीला, गोवर्धन पूजा, कंसवध, द्वारकालीला, सुदामा पूजन, उद्धवोपदेश आदींच्या माध्यमातून भागवत कथेचे निरुपण केले.