- इंद्रजित देशमुख-वारी करणाऱ्या वैष्णवाचे घर कसे असते? यावरही संतांनी चिंतन केले आहे. आज कित्येक घरं मुकी होत निघाली आहेत. घरातील संवाद संपत चालला आहे. नात्या-नात्यांतील अंतर वाढत चालले आहे. अविश्वास, रुक्षपणा, वैचारिक गोंधळ यामुळे जीवनातील रस कमी होत चालला आहे. कुटुंबसंस्था जिवंत राहते ती प्रेम आणि जिव्हाळा या गोष्टींवर. वैष्णवाचे घर या दोन मूल्यांनी भरलेले असते. सर्वत्र ठायी असलेला ईश्वर यावरील श्रद्धा आणि यामुळे घर आणि घरासमोर येणारे जीवजंतू, मुंगीपासून गाईपर्यंत आणि चिमणी-कावळ्यापासून राघू मैनेपर्यंत सर्वांवर तो ईश्वराचा अंश म्हणून प्रेम करतो. वैष्णवाच्या घरात पाऊल टाकल्याबरोबर समाधान, शांतता आणि खरं अहेतूक प्रेम याचा अनुभव येतो. याबाबत संतश्रेष्ठ नामदेवराय म्हणतात...‘पंढरीची वारी जयाचिये कुळी ।त्याची पायधुळी लागो मज ।।तेणे त्रिभुवणी होईन सरता ।न लगे पुरुषार्थ मुकी वारी ।।नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा ।क्षण जीव वेगळा न करी त्यासी ।।नामा म्हणे माझा सोयरा जिवलग ।सदा पांडुरंग तया जवळी ।।या अभंगात नामदेव महाराज एक याचना करतात आणि ती म्हणजे, ज्याच्या कुळात पंढरीची वारी आहे त्याची चरणधूळ मागावी. त्या चरणधुळीच्या स्पर्शाने मी तिन्ही लोकांत श्रेष्ठ आणि श्रेष्ठत्वासाठी मला इतर वेगळा पुरुषार्थ करण्याची गरज नाही. ज्याच्या कुळात वारी आहे त्याला नामाची आवड आहे तेथे सर्वांभुती प्रेम आणि जिव्हाळा आहे. यापासून तो क्षणभरही दूर होत नाही.नामदेव महाराज म्हणतात, असा जो कोणी असेल तो खरोखर माझा जिवलग स्नेही असेल. कारण माझा पांडुरंगही स्वत: त्याच्याजवळ राहत असतो.या देशात कुटुंब नावाची संस्था अजूनही वैभवशाली आहे. ज्या घराच्या उंबºयाच्या आत शांतता असते. त्या घरातील सर्वजण व्यवहारी जगातही यशस्वी होतात आणि हृदयस्थप्रेमाचाही आनंद लुटतात, अशा घरात नितिमंत यश, औदार्य यासारखी जीवनमूल्ये जपलेली असतात. त्यामुळे वैष्णव सदन हे भगवंताचे वसतिस्थान बनून जाते.वैष्णवसदनाविषयी संत एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज म्हणतात -‘जे सुख क्षीरसागरी ऐकिजे ।ते या वैष्णवामंदिरी देखिजे ।।धन्य धन्य ते वैष्णव मंदिर ।जेथे नामघोष होय निरंतर ।।दिंडी पताका द्वारी, तुळसी वृंदावने ।मन निवताहे नाम संकीर्तने ।।ज्याच्या दरुशणे पापताप जाय ।भानुदास तयासी गीती गाय ।।असे जे सात्विकतेने भरलेले घर आहे. ज्या घराचा गुण हा सात्विक आहे. ज्या घरात ईश्वराच्या अस्तित्वाची प्रतीके आहेत. तिथे वाईट असे घडतच नाही. कारण सर्व व्यवहार ईश्वरसाक्षीनेच होतात आणि हे अत्यंत समाधान देणारे असते. याबद्दल संत एकनाथ महाराज म्हणतात की,वैष्णवा घरी देव सुखावला ।बाहेर नवजे दवडोनि घातिला ।।देव म्हणे माझे पुरतसे कोड ।संगती गोड या वैष्णवांची ।।जरी देव नेऊनी घातिला दुरी ।परतोनी पाहे तव घरा भीतरी ।कीर्तनाची देवा आवडी मोठी ।एका जनार्दनी पडली मिठी ।।वारी आणि वारीचे वैभव असलेले हे सारे वैष्णव वारकरी पाहून आपल्या मनाला एक प्रश्न पडणे स्वाभाविक की, असं काय वेगळं वर्तन वैशिष्ट्य या वारकºयांच्या आचरणात आहे. त्यांच्या भावात आहे ते असे की, ‘देव आणि भक्त दुजा नाही.’ हा विचार आणि या विचाराचा मिलाफ आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. महान भगवद्भक्त एकनाथ महाराज आणि त्यांचे पूर्वज भानुदास महाराज यांनी आपल्या प्रश्नाचे खूप गोड उत्तर दिले आहे. वैष्णवाचे घर हे देवाला सुख वाटावे असेच एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ‘वैष्णव म्हणो तया । अवघी देवावरी माया।।’ या वृत्तीने जगणाºया घरातून देवाला दवडून जरी घालवलं तरी तो जायला तयार होत नाही. कारण आपल्या सगळ्या इच्छा या वैष्णवांच्या संगतीने पूर्ण होतात, असे देव आवर्जून सांगतात. असे आनंदाने ओतप्रोत वाटत असलेले सदन आणि या सदनातील आचरणशील निष्ठावंत वारकरी हे माउली ज्ञानोबारायांनी केलेली ‘आनंदाचे आवारू मांडू जगा’ ही उक्ती खºया अर्थाने सार्थ करू पाहणाºया या निरामय परंपरेच्या ठायी नतमस्तक व्हावे असे वाटते.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)