प्रिय मित्र -आपण एकान्तासाठी फारच धडपडला आहात असे आपल्या पत्राावरून दिसते. पण तुम्हाला तो एकान्त तुमच्या कामातही साधता आला पाहिजे ना! नाही तर एकान्तात गेला तर घरादाराची चिंता त्रास देईल व लोकान्तात बसलात तर एकान्तात त्याची धडपड राहील. मला वाटते, आपण दोहोचा समन्वय केला पाहिजे व तो तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या मनाची धारणा योग्यवेळीयोग्य चिंतन करण्याची होईल. हे बघा, साधारण विषयी माणसालासुद्धा लोकान्तात आपली भावना आपल्या पत्नी, पुत्राबद्दल दृढ करता येते. तो त्याकरिता काय वाटेल ते काम करून त्यांच्या भलाईचे नेहमी चिंतन करत राहतो आणि तुम्हाला म्हणे, देवाच्या भक्तीकरिता देवळात जाऊन, डोळे लावून, नाक धरून व कान दाबून चोरासारखे बसून चिंतन करावे लागते आणि तरी ते पूर्ण होणे कठीणच आहे, नाही का?अहो, ज्या दिवशी तुम्हाला देवाची चिंता लागेल त्या दिवशी तुमचा धंदाच तुम्हाला मदत करील. लोकच तुमच्याजवळ हल्लाकल्ला करणार नाहीत. पण प्रथम तुम्हाला वेड तर लागू द्या देवाचे! मी एकान्त करू नये असा आग्रह धरणारापैकी नाही. पण जसे काम करताना शीण येतो तसाच एकान्तातही माणूस जास्त वेळ राहिला तर तेथेही उपद्रव निर्माण करतो. कारण ज्या मनामुळे आपण एकान्त चाहतो ते मन एकान्तात गेले म्हणजे स्वस्थ बसून राहते काय? छे! ते तर जास्त हलकल्लोळ करते. मग त्याला समजावण्यासाठी विवेक बलवान करून स्थिर करावा लागतो. तेही होईल की नाही शंकाच आहे. प्राणायामाने, योगासनाने, मनाची गती थोडी थांबते एवढेच. पण तेवढी कसरत संपली की पुन्हा ते तसेच वागू लागते. हा बऱ्याच साधकांचा अनुभव आहे.माझे म्हणणे असे आहे की काही श्रवणभक्ती करावी. काही नामस्मरणाची वाणी मनाने चालवावी व कामातही त्याला वेळ देत जावा. ‘हात कामी व चित्त नामी’ असाही अभ्यास करावा आणि आपली आवड सत्कार्याबद्दल तन-मन धनाने वाढवावी. म्हणजे मनाला जेव्हा त्याचा स्वाद लागेल तेव्हा लोकान्तातही एकान्त साधता येईल. नाही तर वाघासारखी गुहेत राहण्याची सवय असूनही वेळ आली की उडी मारणार! आपली शिकार थोडीच सोडणार आहे तो! तसे मन वाईट प्रसंगी पाप करणार व मग एकान्तात जाऊन ध्यान साधणार! यात काय अर्थ? त्याकरिता सत्समागम करीत राहावा व संयमाने वागावे म्हणजे मनाला तशी सवय लागेल. पण हे सर्व अभ्यासानेच होत असते.-तुकड्यादास
- संकलन : बाबा मोहोड