प्रिय मित्र-मी ऐकले आहे की तुला प्रार्थना, भजन व व्यायामाचाही उत्तम नाद लागलेला आहे. अरे हे भाग्य सर्वच लोकांना लाभत नाही. मनुष्य हा कुसंगतीमुळे धड मनुष्य राहिलेला नाही व धड जनावरही राहिलेला नाही. त्याची अजब अवस्था झालेली आहे. मनुष्य म्हणावा तर त्याला संस्कृती नाही नि धर्म नाही. समाजसेवा नाही, किंबहुना कुणाशी कसे वागावे याचे सुद्धा ज्ञान नाही.म्हणे मी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे व सर्टिफिकेट मिळवले आहे. असेल तर ते सरकारी नोकरीकरिता! पण बाबा, चार लोकांत तुला काही स्थान? समाजाच्या सुखदु:खाची तुला काही जाणीव? भारताच्या काही साधुसंताचा तुला काही परिचय? काही धर्मग्रंथाचे वाचन? तुझ्या घरी तुझ्या संस्कृतीचे चिन्ह? राष्ट्रपुरुषांचे फोटो तरी? चार गरीब लोक तुझ्याजवळ येऊन प्रेमाने बोलतात तरी काय? व तू त्यांना मोकळ्या मनाने आपले तरी मानतोस काय? असे तर काहीच नाही. आपल्याच थाटात, आपल्याच तालात वय जाते. याला काय माणूस म्हणतात? समाजाने तुझा काय बरे धडा घ्यावा? असे आज-काल झाले आहे. तू मजूर असूनसुद्धा आपल्या पोटाचा धंदा करून सकाळ सायंकाळ ध्यान, सामुदायिक प्रार्थना व ग्रामाच्या सेवेत आपला वेळ देतोस आणि व्यायामाच्या सवयीने तुझ्या शरीराचा बांधा पोशाखशिवायही तू उत्तम ठेवलास ही फार मोठी गोष्ट आहे.मित्रा, कधीतरी तुम्हा लोकांची गरज देशाला असेल. आपण सर्व देशाचे संस्कृतीच्या यंत्राचे पुर्जे आहोत. जेव्हा देशात लढाई येईल तेव्हा आपण धडाडीने सैनिक होऊन भारताला विजयी केले पाहिजे. जेव्हा देशात अन्नधान्याचा तुटवडा पडेल तेव्हा शेतात राबून साथी सांगाती घेऊन धनधान्य वाढविण्याला मदत केली पाहिजे. रोगराई वाढेल तेव्हा घराघरात जाऊन बिमारांची सेवा केली पाहिजे. अशी अनेक समाजसेवेची कामे करून आपला जीव, देह सार्थकी लावला पाहिजे. हाच खऱ्या सेवकाचा बाणा आहे. मानवाचे कर्तव्य आहे.काही लोक मला मंत्र मागतात. मी त्यांना म्हणतो. ‘अहो जरा माणुसकीचे तंत्र तर अगोदर शिका. नंतर मंत्रवाल्या गुरुकडे जा. नाही तर बिचारा गुरुही बदनाम व तुम्हीही तसेच ठोंबे राहाल नाही! हे बघा, माझ्याजवळ हाच मंत्र आहे. समाजाच्या कामी पडा व आपले नाव लोकांच्या तोंडी उत्तम माणूस म्हणून आणा. मित्रा तुझे कार्य असेच वाढत राहो हीच माझी सदिच्छा! - तुकड्यादास
- संकलन : बाबा मोहोड