गुरू कृपाप्रिय मित्र-पत्र मिळाले. आपण लिहिले की मला गुरुदेवाची कृपा व्हावी अशी तळमळ आहे. परंतु हा मार्ग तरी कोण सांगणार? ऐका तर मग.तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी करता येण्याला तरी कुणी शिकवले आहे? त्याचे नाव आठवेल काय? जेवायला, झोपायला, कपडे घालायला व फिरायला जायला कुणी शिकवले आहे? मी म्हणतो- हे शिकविणारे घरोघरी आहेतच ना? तसेच गुरू-कृपा होण्यालाही काय करावे हेही शिकवणारे हजारो ग्रंथ, हजारो पंडित व अनेक संत, पंथ आहेतच ना? प्रश्न आहे, आपल्यालाच त्याची जरा काळजी असावी लागते व त्याकरिता जे आपल्या गुरुदेवाला आवडेल तसे आपल्या शरीराला वळण द्यावे लागते. कृपा गुरूची हवी व आचरण चोराच्या ठायी, कृपा देवाची हवी व वागणूक राक्षसाच्या ठायी असे धोकेबाज आचरण कुणाला कसे बरे आवडेल?मला सांगा- घरची स्त्रीसुद्धा प्रसन्न करायची असली तर तिच्या स्वभावाप्रमाणेच वागावे लागते. मित्र करावयाला सुद्धा समान शील लागते. दारूबाज लोकांचा मित्र वीर माणूस कसा होणार? साधूची मैत्री स्रैण लोकांशी कशी जमणार? आणि सात्विक प्रवृत्तीचा मेळ तमोगुणाशी कसा होणार? हे नाही का आपल्याला कळत? सहज कळण्यासरखे आहे. कारण हा निव्वळ व्यवहारच आहे ना! यावरून बोध घेऊन अपाल्याला गुरू-कृपा म्हणजे त्यांची प्रसन्नता प्राप्त करावयाची आहे. तेव्हा त्यांना आवडेल असेच वागले पाहिजे.गुरू-कृपा होण्याला शप्रथम शिष्यपणा म्हणजे पात्रता अंगी आली पाहिजे. गुरूचे मन, गुरूची बुद्धी, गुरूच तप याशी शिष्य अनन्य झाला पाहिजे तरच गुरूची कृपा होणार. यासाठी प्रथम गुरू-आज्ञेचे व्रत पाळले पाहिजे आणि त्यासाठी जी हिंमत, जो त्याग, जी गंभीरता, जो संयम, सेवा शुश्रुषेची भावना, नम्रता वगैरे जी साधू संतांनी नवविधा भक्ती सांगितली आहे, त्यांचे श्रवण, मनन व निदिध्यासन केले पाहिजे. म्हणजे मग गुरू-कृपेचा साक्षात्कार होत असतो.आपण म्हणाल- ‘अहो, हे सर्व मला अनेकांनी सांगितले आहे. पण मन तसे वागत नाही ना?’माझ्या मते याला उपाय असा. जर थंडी हवी असेल तर गरम घरात बसू नये. उष्णता हवी असेल तर बर्फाच्या जागेत झोपू नये. तद्वतच जर संत-समागम हवा असेल तर दुष्टांचा संग करू नये व सन्मार्ग लाभावयाचा असेल तर कुमार्गाने वा कुसंगतीने जाऊ नये. नेहमी गुरूसेवेचे चिंतन करीत तसे कार्य करीत राहिले पाहिजे. म्हणजे मग कृपा ही आपोआपच मिळेल. पण जर आपलेच चुकत असेल तर त्यांना तरी आपण कसे म्हणणार?मित्रा, म्हणून प्रथम तू हे शिक की, गुरुदेवाजवळ तरी तुझे दोषी लपवू नकोस. मोकळा बोल. छल, कपट करू नकोस. काय होते ते सांग आणि मग त्यांनी जे सांगितले ते प्राण गेला तरी करायचे सोडू नकोस.लोकांनी मूर्ख म्हटले तरी चालेल. पण आपला हट्ट सोडू नकोस. तुला जर का शंका आली तर गुरुजवळच सांग. त्यांची आज्ञा माग आणि स्वप्नातही गुरुदेवाच्या सेवेशिवाय इतरत्र प्रेम करू नकोस. हे जर तुला साधले तर गुरुदेवच तुझ्याजवळ येऊन तुला कृपापात्र करतील. हाच गुरू-कृपेचा सुलभ माग आहे.-तुकड्यादास
- संकलन : बाबा मोहोड