प्रिय मित्र-मोक्ष अथवा मुक्ती म्हणजे काय? आपण विचारल्यावरून उत्तर लिहीत आहे. मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळे होणे, आसक्तीपासून अनासक्त होणे. हे मोकळे होण्याचे अनेक मार्ग आहेत. एखाद्या कार्यापासून मोकळे हे तेवढ्यापुरतेच झाले. पण संपूर्ण व्याधी-उपाधी, शरीराची, मनाची, बुद्धीची किंबहुना ज्ञानाचीही अहंरूपाने सोडून स्वरूपाशी तादात्म्यवृत्ती साधणे यालाच मोक्ष मिळणे म्हणतात. दानाने, धर्माने, परोपकाराने, सेवेने उच्च गती प्राप्त होते. कारण जीवाची उच्चांक अवस्था त्याने मिळते. स्वर्गपद मिळते किंबहुना इंद्रपदही मिळणे शक्य आहे. कारण त्या जीवात देवतांनाही वश करून त्यांच्या प्रसन्नतेने त्याने राज्य घेणेही संभवते. पण मोक्षाला तर हे सोडून निव्वळ परमपदाच्या ठिकाणी विलीनच व्हावे लागते.ज्या पदाला गेल्यानंतर पुन्हा येणे नाही, पुण्य आणि पापाचीही वासना उरलेली नाही, असे जीवा-शिवानी अभिन्नपण ज्याने मिळविले असेल, सोहं तत्त्वांशी ज्याचे तादात्म्य झाले असेल अशा निर्विकार वृत्तीरहित पुरुषालाच मोक्ष संभवतो. पण तो प्राप्त करण्याला प्रथम सदाचारी, शुद्धविचारी चित्त स्थिरतची व गुरुदेवाच्या आज्ञेकरिता प्राण पणाला लावणारी श्रद्धा असावी लागते. त्यामुळे मनातील व अंगातील सर्व दुुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांचा आश्रय करावा लागतो. अशा नियमांनी वागणारा मग गृहस्थधर्मी असो वा संन्यासी असो, त्यालाच मोक्षाचे सुख म्हणजे धाम प्राप्त होणे संभवते. निव्वळ वेदांताच्या चर्चा करून व तीर्थाटने करून मोक्ष मिळणे दुर्लभ आहे.कारण त्याने वासनेचा त्याग होत नाही. उलट मनाच्या भराऱ्या मारण्याला मदत मिळते व नसता प्रवासाचा, देवाच्या-संतांच्या, बाह्य स्वरूपांचा अहंकार जमा होतो. त्याने वासना थांबत नाही; तर तिला पुन्हा खेळण्याला जागा मिळते ती आत्म-स्वरूपाकडे जाण्याला प्रवृत्त झाली पाहिजे. हळूहळू विषयापासून, उपाधीपासून, दंभ-दर्भ-द्वेषापासून सुटली पाहिजे. लहान जीवापासून तो मोठ्या जीवापर्यंत नम्रता, समरसता धारणा करू शकली पाहिजे. असे साधन जी उपासना, जो देव, जे संत देत असतील व अभ्यासक घेत असतील तेच मोक्षसाधनाला प्राप्त करून देऊ शकतात. सामान्य माणूसही ज्ञानाने व जाणिवेने मोक्ष प्राप्त करू शकतो. त्याला यज्ञाची, जप-तपाची, धन व जातीची जरूर नाही. केवळ ज्ञान प्राप्त करून जीवाला अज्ञानजनक संगतीचा त्याग करूनही पुरूष मोक्षाचा धनी होतो. -तुकड्यादास
- संकलन : बाबा मोहोड