प्रिय मित्रसंत मीराबाईबद्दल आपण विचारले की तिला प्रेमभक्ती कशी प्राप्त झाली? आपल्या या प्रश्नासंबंधीचे माझे विचार मी आपणास कळवीत आहे. हे बघा! भक्तीसाठी राणीपदाची, ऐश्वर्याची गरज नाही. कोणतीही महिला आपल्या शुद्ध अंत:करणाने प्रभुभक्तीत तदाकार झाली तर ती मीरेप्रमाणेच संत होऊ शकेल. साध्वी होऊ शकेल. कोणताही भक्त भक्तिभावाने प्रभूशी समरस झाला की देव त्याच्या ओंजळीने पाणी पिऊ लागतो, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. पण जीवनाला भक्तीचा रंग किती चढला यावरच हे अवलंबून असणार! भक्तीचा संबंध बाहेरच्या अवडंबराशी मुळीच नाही. तो मनाशी व हृदयाशी आहे. ज्या भक्ताचे हृदय भक्तीने भिजून गेलेले असते, ज्या भक्ताचे मन विकल्परहित झालेले असते तेव्हाच त्याच्यासमोर त्याची देवता नाचू लागत असते. प्रश्न असा आहे की ही वृत्ती निर्माण करण्याला काय करावे लागत असते? माझे मत असे आहे की संकटे किंवा संतसमागम या दोन गोष्टींमुळे ही गोष्ट शक्य होते. संतसमागमातून सद्बुद्धी मिळते. संकटांशी सामना करण्याने मनाची ताकद वाढते. पण संकटांशी सामना करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते.संतसमागमासाठी हरिकथा घोकावी लागते. जग हे स्मशानवत समजून वैराग्य प्राप्त करावे लागते. सुख आणि संपत्ती या गोष्टींपासून बाजूला सरकावे लागते.मित्रा, शेवटी मन, बुद्धी व अहंकार ज्या मार्गाने जातात तसाच माणूस बनणार आणि तसाच त्याला अनुभव येणार. तुला दुसऱ्याची कथा आवडते पण प्रत्यक्ष काही करण्याची वेळ येईल तेव्हा मन घडीघडी कसे बदलत जाते याची साक्ष पटेल. यासाठी भक्तांनी व मीरेने काय काय आपत्ती सहन केल्या, हे काही नव्याने सांगण्यासारखे नाही. शेवटी जहराचा पेलासुद्धा तिच्या जवळच्या, घरातल्या लोकांनी दिला ना? हे सारे सहजपणे थोडेच घडते? ज्याप्रमाणे विषयांध माणूस जिवावर उदार होऊन लाज-शरम न बाळगता आपल्या प्रिय वस्तूला प्राप्त करून घेतो, त्याचप्रमाणे देवाशी जेव्हा प्रेम जडते तेव्हा काय होईल ते होवो पण आपल्या देवाशी अंतर पडू नये, असे भक्ताच्या मनाने घेतलेले असते. तो देवाच्या सख्यत्वासाठी वाटेल तसा प्रयत्न करून देवाची भक्ती करतो; व शेवटी देवस्वरूप होतो आणि मग देवाचे कार्य हेच आपले कार्य मानून देवाशी तादात्म्य पावतो असेच मीरेचे व अनेक भक्तांचे झाले आहे. येथे राणीच कशाला? कुब्जा, भिल्लीण, राधा, सखू, जनी, मंदोदरी सर्वांनी आपल्या जीवनाच्या पणत्या देवाजवळ पाजळल्या आणि जळलेल्या कापराप्रमाणे देवाशी समरस झाल्या. देवाच्या प्राप्तीसाठी स्वत:ला विलीन करून घेणे हीच प्रेमभक्तीची खूण आहे. -तुकड्यादास
- बाबा मोहोड