प्रा. शिवाजीराव भुकेलेलोकशिक्षक संत एकनाथांचे नीती नावाचे भारूड जेव्हा परवा वाचनात आले, तेव्हा एका कटू सत्याचा साक्षात्कार झाला. अरे! नाथांच्या या भारुडाची मध्ययुगात जेवढी गरज नव्हती, तेवढी सामाजिक गरज आज निर्माण झाली आहे. नाथांच्या काळात काठीला सोने बांधून लोक काशीला जात होते म्हणे. आज मात्र घरातील तोळा-दोन तोळे सोने रात्रीचे चोर काठीचा धाक दाखवून चोरून नेतात, तर दिवसाचे चोर ख्यालीखुशाली जीवन जगण्यासाठी दिवसाढवळ्या दुसऱ्याला लुबाडतात. तेव्हा वाटायला लागते ‘नीती’ला खरंच आम्ही धाब्यावर बसवून अनीतीचा धबधबा समाज जीवनावरून धोऽऽ धोऽऽ वाहू लागला आहे. जो लाच मागत नाही, जो सरळ मार्गाने समोर आल्या-आल्या लोकांचे काम करतो, अशा प्रशासकीय अधिकाºयाला एक तर भोळसट मानले जाते अथवा नेभळट म्हणून त्याची प्रतारणा केली जाते. अनीती ही समाजाच्या पतनाची निसरडी वाट आहे. भले-भले या वाटेवरून घसरून पडले आहेत. तरीदेखील समाजात त्यांनाच प्रतिष्ठेच्या ‘गढ्यावर’ विराजमान केले जात आहे. अशा वेळी संत एकनाथ महाराज म्हणतात,
नीती सांगतो ऐका एक, दास दाभिचा सेवकसांडावरून जाऊ नयें, लाच खाऊ नयेंअक्रीत घेऊ नयें, इमान तोडू नयेंबेभान होऊ नयें, कोणी एक ॥
नाथांचे हे दीर्घ भारूड आचार, विचार, कृती आणि उच्चार शिकविणारे नीतिशास्त्र आहे. संस्कारी समाजाची ती एक आचारसंहिता आहे. नीतिमान समाजात सद्भाव, सद्धर्म, सद्गती, सद्विचार या खºया दैवी गुणांची निर्मिती होऊ शकते. ही दैवी संपत्तीची नीती कुठून आकाशातून किंवा पाताळातून येत नाही, तर समाजातील थोरा-मोठ्यांच्या आचरणातून इतरांपर्यंत पाझरत जाते व समाज जीवनात हळूहळू सज्जन माणसांची संख्या वाढत जाते. संत ज्ञानेश्वर माउलीने सज्जनांना कलंकरहित चंद्रमाची व तापरहित सूर्याची उपमा देताना म्हटले आहे -चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन ।ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे हो तू ।
सज्जनाचे सोयरेपण समाजात शिवत्वाचे चांदणे शिंपित जाण्याचे काम करते, म्हणून अशा सज्जनाची समाजात जर वृद्धी व्हायची असेल, कुणाच्या सत्संगाला जायचे असेल तर जा अगर जाऊ नका. कुठल्या स्वामी आणि संत महंताच्या पायावर मस्तक टेकायचे असेल तर टेकवा अगर टेकवू नका. कुठल्या देवाच्या मंदिराचे उंबरे झिजवा अगर झिजवू नका. फक्त एकच काम करा. पाप, वामाचार, दंभ, दुराचार, भ्रष्टाचार ही अनीतीची पिलावळ माझ्या घरात चोरपावलांनीसुद्धा येणार नाही याची दक्षता घ्या अन् बघा, खरंच! घरा-घरांत स्वर्गीय सुखाचा श्वाश्वत आनंद प्राप्त होतो की नाही. तशी नीतिमत्तेची कल्पना जरी व्यक्तिसापेक्ष असली, तरी नीतीचे काही सर्वसामान्य नियम आहेत, जे लोकरक्षणासाठी उपयुक्त आहेत. आधुनिक युगातील भौतिक बदलाचा स्वीकार करून ही समाज व कुटुंबावरची नीतिमत्तेची बंधने समाजाचा वारू स्वैर उधळू नये म्हणून स्वीकारावीच लागतील, अन्यथा नाथांनीच वर्णन केल्याप्रमाणे -कलियुगाची दादा ऐकावी थोरी,पुत्र तो होईल पित्याचा वैरी ।ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी।।
या अवस्थेपासून आम्ही फारसे दूर नाही. तेव्हा समाजाच्या शिवत्वाची रक्षा करायची असेल तर किमानपक्षी कौटुंबिक नीतिमत्तेचे तरी आचरण करूया आणि सुदृढ समाज निर्मितीचे संतांचे स्वप्न काही अंशाने साकार करूया.