- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
अध्यात्म शास्त्रात जीव हा ईश्वराचाच अंश आहे. देवाचा आणि जीवाचा अनादी काळापासून संबंध आहे. देव जसा सूक्ष्म तसा जीव देखील सूक्ष्म आहे. देव जसा दिसत नाही, तसा जीव देखील दिसत नाही. देव जसा अविनाशी तसा जीव देखील अविनाशी. देव जसा चैतन्यमय, तसा जीव देखील चैतन्यमयच.. संत तुलसीदासजी वर्णन करतात -ईश्वर अंश जीव अविनाशी..चेतन अमल सहज सुखराशी..!मनुष्य देहाला जे महत्त्व प्राप्त झाले ते जीवामुळेच झाले. या शरीरावर फक्त जीवाचीच सत्ता आहे. तुकाराम महाराज म्हणतात हात पाय दिसे शरीर चालता..नाव भेद सत्ता जीवाची ती..!असा हा जीव भगवंताचा अंश असला तरी अविद्येमुळे व मायाजाळी गुरफटल्यामुळे भगवंतापासून विन्मुख झाला. मानव देह मिळाल्यानंतर सर्व प्रथम कोणते कर्म करावयाचे तर, जीवाला भगवत् सन्मुख करण्याचे. समर्थ रामदास स्वामी म्हणतातसांगा नरदेह जोडले आणि परमार्थ बुध्दी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळी..!माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करते. जीवाला उद्वीग्न करते. माया ही छायेसारखी आहे. छायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्याच्या विरूद्ध दिशेला तोंड करून चाललो तर छायेचा अनुभव येतो. छायेच्या अनुभूतीचे कारण जशी सूर्याची विन्मुखता तसेच मायेच्या अनुभूतीचे कारण भगवंताची विन्मुखता. त्यासाठी माया निर्मूलनाचा उपाय म्हणजे फक्त भगवत् सन्मुखता. अशी देव सन्मुखता प्राप्त होण्यासाठी देह बुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धीशी ऐक्य होण्याची गरज आहे. आत्माराम ग्रंथात समर्थ रामदास स्वामी म्हणतात -अहं ऐसे जे स्फुरणतेचिं मायेचे लक्षणतयें मायेपासून त्रिगुणगुणापासून भूतेंअज्ञानामुळे, अविद्येमुळे जीवाला दु:ख प्राप्त होते. देह बुद्धीने केलेली कर्मेच जन्म मरणास कारण ठरतात. आत्मबुद्धीने केलेली कर्मे मोक्षपदाला नेतात. मानवी देहाला येऊन अशी साधना करावी की या जन्म मरणाच्या भवबंधनातून मुक्त होता येईल..!
(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 )