भगवान शंकराची पूजा केली जाणारी महाशिवरात्री अनेक उत्सवांपैकी एक महत्वाची मानली जाते. माघ मास पक्ष चतुर्दशीला “महाशिवरात्र” म्हणतात. महा-मोठी व भगवान शिवशंकराची ही सर्वात मोठी रात्र म्हणून ओळखली जाते. या दिवशी सर्वांनी सकाळी दर्शन ऎवजी रात्री दर्शन घ्यावे असे मानले जाते. तसेच पूजा करण्यासाठी या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीवर दूध, दही, पंचामृत, मध, ऊसाचा रस, भांगेचे दुध, गोरोचन, चंदन, अष्टगंध, भस्म आदी गोष्टी अर्पण कराव्यात. तसेच ११ बेल, ११ पांढरी फुले, नारळ अर्पण करुन भगवान शंकराला प्रसन्न करावे. आज देशात वेगवेगळ्या ठिकाणी जत्रा भरतात. या जत्रांमध्ये लोक आनंदाने आपल्या परीवारांसोबत सहभागी होतात.
या दिवशी सगळ्यांनी शिवमानस पूजा करावी म्हणजेच या दिवशी संपूर्णवेळ भगवान शिवशंकराच्या ॐ नम: शिवाय आणि महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा,असे मानले जाते. देवळात जाणे शक्य नसल्यास तुम्ही कोठूनही भगवान शंकराचे मनापासून स्मरण केल्यास ते भगवान शंकरापर्यंत पोहचते.
महाशिवरात्र’ हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला हे पर्व असते. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते असे म्हटले जाते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ‘शिव’ म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता शिवशंकर भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो असेही मानले जाते.
महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात.
महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.
महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो. शिवरात्री वर्षभरात प्रत्येक महिन्यात येत असते. मास महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.